मतदान टक्केवारी वाढीसाठी अधिक प्रयत्नांची गरज* *-जिल्हाधिकारी जलज शर्मा*
*मतदान टक्केवारी वाढीसाठी अधिक प्रयत्नांची गरज*
*-जिल्हाधिकारी जलज शर्मा*
*नाशिक, दिनांक 22 फेब्रुवारी, 2024 वृत्तसेवा) :* भारत निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमिवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी SVEEP (स्वीप) मतदार जागृती व विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने मागील पंचवार्षिक निवडणुकीत कमी टक्केवारी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने अधिक लक्ष देवून प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत यापूर्वी केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघुपाटबंधारे) तथा स्वीप कार्यक्रम समन्वय अधिकारी शुभांगी भारदे, नाशिक व मालेगाव महानगरपालिका उपायुक्त, नगरपरिषद प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद, क्रीडा विभाग, समाजकल्याण, शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, स्वीप कार्यक्रमांतर्गत पारंपरिक उपक्रमांपेक्षा थेट शेवटच्या मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, असे उपक्रम आयोजित करावेत. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये कमी टक्केवारी असलेल्या मतदान केंद्रांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात यावे. नाशिक व मालेगाव महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रामध्ये अधिकाधिक प्रयत्न करुन शहरी भागातील मतदान टक्केवारी वाढविणेकरिता काम करावे. सर्व शासकीय कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी त्यांचे मनोगतादरम्यान मतदारांची जागरुकता वाढविणेकामी वेळ द्यावा, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खेडोपाडी मतदार जागरुकता मोहीम राबवावी. अपंग, तृतीयपंथी मतदारांकरिता विशेष प्रयत्न करावेत. कामगार विभागाने मतदानादिवशी नोंदणीकृत कामगारांना पगारी सुट्टी देवून मतदानाकरिता उद्युक्त करावे. जिल्हा परिषदेमार्फत महिला विशेष ग्रामसभांमध्ये महिला दिन दरम्यान मतदान टक्केवारी वाढविणेकामी प्रबोधन करावे. नवमतदारांकरिता शिक्षण व क्रीडा विभागाने विविध उपक्रम राबवावेत. लोकसभा-2019 च्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत 20-दिंडोरी लोकसभा मतदार संघात 65.66 टक्के आणि 21-नाशिक लोकसभा मतदार संघाची 59.43 टक्के अशी आकडेवारी होती. एकंदरीत मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत कमी असलेली टक्केवारी वाढविणेकामी सर्वच विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश श्री. शर्मा यांनी यावेळी दिले.