खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात* *कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे*

*खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात*
*कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे*
*जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न*
*नाशिक*जन्मत, दि. १९ : आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बि- बियाणे, खते, कीटकनाशकांसह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीयकृत बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. खतांचे लिकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी आज येथे दिल्या
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, विभागीय कृषी सहसंचालक श्री. काटकर, प्राचार्य रामेती श्री. आमले, स्मार्ट नोडल अधिकारी श्री. वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाने तयार केलेल्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती व घडीपत्रिकेसह कृषी विभागाच्या व्हॉटस ॲप चॅनेलचे आणि संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. तसेच आरसीएफतर्फे विक्रेत्यांना पॉस मशीनचे वितरण करण्यात आले.
मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, हवामान विभागाने यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील, असा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, अशी दक्षता घ्यावी. पणन विभागाने सुविधा केंद्रांचे तातडीने अद्ययावतीकरण करावे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरण करावे. त्यासाठी
अग्रणी बँक व सहकार विभागाने, तर शेततळेधारक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळण्यासाठी वीज कंपनीने पाठपुरावा करावा. जिल्ह्यात रेशीम लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रारुप आराखडा करावा. त्याबरोबरच रेशीम लागवडीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले. आमदार श्री. खोसकर यांनी सांगितले की, कृषी विभागाने दुर्गम, आदिवासी भागात आंबा लागवड, रेशीम शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खासदार श्री. वाजे, आमदार श्री. बनकर यांनीही सूचना केल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. काशीद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात ६ लाख 44 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा होणार आहे. त्यासाठी बि- बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याबरोबरच आपत्कालिन पीक नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात विभागस्तरावर दोन, जिल्हास्तरावर ६, उपविभागस्तरावर ८ व तालुकास्तरावर ३० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.