बीसीसीआयच्या विजय मर्चंट स्पर्धेत नील चंद्रात्रेची अफलातून कामगिरी
बीसीसीआयच्या विजय मर्चंट स्पर्धेत
नील चंद्रात्रेची अफलातून कामगिरी
गोवाविरुद्ध सामन्यात १५ बळी
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नील चंद्रात्रेने बी सी सी आय च्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातर्फे सामन्यात १५ बळी टिपण्याची अफलातून , अविश्वसनीय कामगिरी केली. आपल्या भेदक डावखुरया फिरकी गोलंदाजीने गोवाविरुद्ध तीन दिवसीय कसोटीत पहिल्या डावात नीलने ७ बळी तर दुसऱ्या डावात ८ बळी टिपले. या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने गोवा संघावर दुसऱ्याच दिवशी एक डाव व २०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीत प्रज्वल मोरेने नाबाद १५१ धावा केल्या.
सुरुवातीच्या काही सामन्यात संघात समावेश नसलेल्या नीलला गोवाविरुद्धच्या सामन्याआधी खास बोलावून घेण्यात आले. नीलने पहिल्या डावात ८ षटके २ निर्धाव २१ धावा व ७ बळी तर दुसऱ्या डावात ९ षटके २ निर्धाव १५ धावा व ८ बळी अशी १५ बळी टिपण्याची प्रचंड कामगिरी करत एकप्रकारे संघातील आपले पुनरागमन साजरे केले व आपल्या डावखुरया फिरकीचे नाणे पुन्हा एकदा या १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खणखणीतपणे वाजवले.
नीलने याआधी विविध वयोगटात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या – इन्व्हिटेशन लीग व सुपर लीग – क्रिकेट स्पर्धेत वेळोवेळी नाशिक जिल्हा संघातर्फे पुढील प्रमाणे प्रभावी अष्टपैलू कामगिरी केली आहे :
१- २०२२-२३ – १४ वर्षांखालील गटात २९८ धावा व २३ बळी
२- २०२३ – १६ वर्षांखालील गटात २०१ धावा व ४० बळी
३- २०२४ – १४ वर्षांखालील गटात ३०३ धावा व २१ बळी
४- २०२४-२५ – १६ वर्षांखालील गटात १०३ धावा व २९ बळी
याप्रमाणे १४ व १६ वर्षांखालील गटात गेल्या दोन वर्षात ९०५ धावा व ११३ बळी तर फक्त १६ वर्षांखालील गटात एकूण ७० बळी अशी प्रभावी कामगिरी केली आहे.
सुरत येथे सुरु असलेल्या विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राचा पुढील साखळी सामना – २८ ते ३० डिसेंबर – वडोदरा संघाशी होणार आहे.
नीलला सुरुवातीपासून नाशिकचे जुने खेळाडू प्रशिक्षक संजय मराठे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांनी नीलच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याबरोबरच नील चंद्रात्रे याचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी खास कौतुक करून उर्वरित स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.