देश-विदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाणून घेऊ या सीमेवरील सैनिक कसे करतात मतदान !!!

 

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

जाणून घेऊ या सीमेवरील सैनिक कसे करतात मतदान !!!

 

नाशिक, दिनांक 20 मार्च, 2024 (नासिक जनमत वृत्तसेवा) :

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम मा. भारत निवडणूक आयोगाकडून दि. 16.03.2024 रोजी घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात दि. 20 मे रोजी मतदान घेण्यात येईल. मतदान करण्यासाठी मतदार म्हणून नोंदणी केलेल्यांचे नाव मतदार यादीत आले आहे. आपले नाव ज्या मतदान केंद्रांच्या मतदार यादीत आहे त्या ठिकाणी आपण समक्ष जाऊन मतदान करू शकतो. मात्र विचार करा ……..आपल्या देशाच्या सीमेवर तैनात असलेले सेना दलाचे जवान मतदानाच्या दिवशी कसे मतदान करू शकतील….!!

 

सैनिक मतदार कर्तव्यासाठी देशाच्या सीमेवर असल्याने मा. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी मतदानाची स्वतंत्र तरतूद केलेली आहे. यामुळे सैनिक मतदार मतदानापासुन वंचित रहात नाहीत. ते जरी आपल्या घरापासून, गावापासुन दुर कार्यरत असले तरी त्यांना टपाली मतपत्रिकेच्या सहाय्याने मतदान करता येते.

 

सेनादलाचे जवान आसाम रायफल्स, सीरआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीएफ, जीआरईएफ, बॅार्डर रोड ऑर्गनायझेशन, सीआयएसएफ इ. चे जवान यांच्यासाठी मतदार नोंदणीचा नमुना अर्ज 2 भरून नोंदणी करता येते. आता आयोगाने यासाठी सर्व्हिस व्होटर पोर्टल विकसित केले असुन देशाच्या कोणत्याही भागात कर्तव्यावर असलेले सैनिक त्यांचे रेकॅार्ड ऑफिसचे माध्यमातून मतदार नोंदणीचा अर्ज त्यांचे मूळ गाव ज्या मतदारसंघात आहे त्या मतदार नोंदणी अधिका-यांकडे ऑनलाईन मतदार नोंदणी अर्ज पाठवतात.

 

सैनिक मतदारांकडून प्राप्त झालेले अर्ज तपासून मतदार नोंदणी अधिकारी अर्ज स्वीकृत करून घेतात. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा शेवटचा मतदार यादी भाग सेना दलातील मतदारांसाठी असतो. या यादी भागात मतदार नोंदणी अधिकारी सेना दलातील मतदाराचे नाव समाविष्ट करून घेतात. ही सगळी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सर्व्हिस व्होटर पोर्टलचे माध्यमातून ऑनलाईन होत असते.

 

सेना दलातील मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी त्यांना आयोगाने विकसित केलेल्या ETPBMS प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन मतपत्रिका पाठविण्यात येते. या प्रणालीमुळे देशाच्या

 

 

 

कोणत्याही भागात कार्यरत असलेल्या सैनिकांपर्यंत मतपत्रिका क्षणार्धात पोहोचते. सैनिक मतदार आपल्या लॅाग इन द्वारे आलेल्या मतपत्रिकेची प्रिंट घेऊन त्यांचे रेकॅार्ड ऑफिसमध्ये आयोगाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या मतदान कक्षात मतदान करतात. मतदान झाल्यावर यासाठी विशिष्टरित्या तयार केलेल्या पाकिटातून पोस्टाद्वारे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतपत्रिका पाठवण्यात येतात. या पोस्टेजचा खर्च भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात येतो. से्ना दलातील मतदारांनी मतदान करण्याची प्रक्रिया त्यांचे रेकॅार्ड ऑफिसमध्ये आयोगाचे निर्देशानुसार काटेकोरपणे पूर्ण करण्यात येते.

 

सेनादलातील मतदारांकडून यानुसार प्राप्त मतपत्रिकेचे पाकीट निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात पोस्ट विभागाकडून पोहोच करण्यात येते. मतमोजणीच्या दिवशी या टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक अधिकारी करतात. सेनादलातील मतदार टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून आपले देशरक्षणाचे कर्तव्य पार पाडण्याबरोबरच मतदानाचे कर्तव्य देखील पार पाडत असतात. नाशिक जिल्ह्यात येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता एकूण 8,188 सैनिक मतदार ETPBMS प्रणाली द्वारे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवतील. 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे