देश-विदेश

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत होण्यासाठी सर्वांनी समन्वयाने नियोजन करावे*        *: मंत्री गिरीष महाजन*

 

 

*आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत होण्यासाठी सर्वांनी समन्वयाने नियोजन करावे*

*: मंत्री गिरीष महाजन*

*सिंहस्थ कुंभमेळा जिल्हास्तरीय बैठक संपन्न*

 

*नाशिक, दिनांक 14 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिल्या.

आगामी कुंभमेळा जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री गिरीष महाजन म्हणाले, 2026-27 या वर्षामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहर व त्र्यंबक येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून रस्त्यांच्या दुतर्फा आवश्यक सुविधा तसेच सौंदर्यीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत आगामी कुंभमेळ्यात साधुमहंत तसेच भाविकांची संख्या दुप्पटीने वाढेल याचा विचार करून कुंभमेळा काळात करण्यात येणारी पार्किंग व्यवस्था त्र्यंबकेश्वरजवळ करण्यात यावी. तसेच नाशिकमध्ये गोदावरीवर असलेल्या घाटांची दुरूस्ती, जलशुद्धीकरण केंद्रांचे अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. कुंभमेळा कालावधीत नदी प्रदूषण होणार नाही यासाठी उपाययोजना, स्वच्छतागृह, सांडपाणी व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, कायदा सुव्यवस्था, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था यांचे सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताचे कुंडाचा काही प्रमाणात विस्तार करता येतो का, याबाबत पुरातत्व विभागातील तज्ज्ञांचे तसेच तेथील पुरोहितांचे, साधुमहंतांचे देखील मार्गदर्शन घेण्यात यावे. जेणेकरून पर्वणी कालावधीत तेथे गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होईल, असे ही मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकार तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अतिशय सकारात्मक असल्याने 2026-27 या कालावधीत आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्याकरिता केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी मनुष्यबळाची देखील मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार असल्याने त्यासाठी देखील नियोजन करण्यात यावे. मागील कुंभमेळ्याप्रमाणेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित व नियोजनबद्धरित्या पार पडण्यासाठी गेल्या कुंभमेळ्यात काम केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा देखील यावेळी घेण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा लाभ येत्या कुंभमेळ्यासाठी होईल. पुढील जिल्हास्तरीय बैठकीत साधुसंत, पुरोहित यांना देखील आमंत्रित करावे. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सूत्रबद्ध पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात यावी. त्याचप्रमाणे कुंभमेळ्याच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी व सर्व संबंधित यंत्रणामध्ये समन्वय रहावा यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखील समिती स्थापन करण्याच्या सूचना ही यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी दिल्या.

 

बैठकीच्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. त्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित आमदारांनी कोणत्या स्वरुपाची कामे करणे आवश्यक आहेत त्या स्वरूपात सूचना मांडल्या. तसेच त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी देखील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर त्र्यंबकेश्वर येथील सद्यस्थितीची माहिती दिली

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे