जिल्हा युवा पुरस्कारासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत* *: सुनंदा पाटील*
वृत्त क्र. 85 दिनांक: 13 एप्रिल 2023
*जिल्हा युवा पुरस्कारासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत*
*: सुनंदा पाटील*
*नाशिक, दिनांक 13 एप्रिल, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
युवा वर्गातील युवक व युवतींनी केलेल्या कामाचा गौरव करून त्यांना प्रोत्सहित करण्यासाठी राज्याच्या नवीन युवा धोरणानुसार राज्य व जिल्हा पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी 20 एप्रिल 2023 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक येथे सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्याद्वारे पुरस्काराचे 1 मे 2023 रोजी वितरण होणार आहे. त्याअनुषंगाने पुरस्कारासाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 201311121122043321 या संगणक सांकेतांकावरील शासन निर्णयात शेवटी विहित नमुना अर्ज उपलब्धआहे. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज, आवश्यक सर्व छायांकित सत्यप्रतीतील कागदपत्रे व तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे इत्यादी सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यात 20 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, हुतात्मा स्मारकाच्या मागे, जिल्हा कोर्टासमोर, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत सादर करावीत. जिल्ह्यामध्ये जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्यास प्राप्त राहणार नाही. त्याचप्रमाणे पुरस्कारसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी महराष्ट्रात सलग 5 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.
जिल्हा युवा पुरस्कारांसाठी 2021-22 व 2022-23 या वर्षांकरीता युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांनी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील मागील तीन वर्षांत ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन, राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती, जनजाती आदिवासी भाग इत्यादी बाबातचे कार्यशिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य पर्यावरण, सांस्कृतिक, कला, कलाक्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभृण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्या, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छवस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या इत्यादी क्षेत्रात केलेले कार्य व कामगिरीचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. एक युवक व एक युवती गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 10 हजार व नोंदणीकृती संस्था- गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 50 हजार असे जिल्हास्तरीय युवा पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी महेश पाटील यांच्याशी 9421500556 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तसेच यापूर्वीच्या जाहिरातीनुसार 2021-22 या वर्षासाठी सादर केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या अर्जात काही अतिरिक्त कागदपत्रे जोडावयाची असल्यास वर नमुद केलेल्या मुदतीत जोडता येतील किंवा नव्याने देखील प्रस्ताव सादर करता येतील, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.
0000000000