विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता नाशिकचा मुर्तुझा ट्रंकवाला महाराष्ट्र संघात
कृपया पुढील बातमी प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करावी :
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता
नाशिकचा मुर्तुझा ट्रंकवाला महाराष्ट्र संघात
नाशिककर क्रीडा शौकिनांसाठी, खास करून क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी. नाशिकचा सलामीचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला महाराष्ट्र संघातर्फे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय- च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता निवडण्यात आला आहे.
याबरोबरच मुर्तुझा ट्रंकवालाचे महाराष्ट्र संघात पुनरागमन होत आहे . २०१७ सालीच मुर्तुझाचा महाराष्ट्र रणजी संघामध्ये पहिल्यांदा समावेश झाला होता. त्यावेळी पहिल्याच रणजी सामन्यामध्ये मुर्तुझाने शतक झळकावले होते व पदार्पणातच शतक झळकवणारा नाशिकचा पहिला खेळाडू ठरला होता. मुर्तुझा २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचाहि कर्णधार होता. मुर्तुझाने महाराष्ट्र संघातर्फे प्रथम श्रेणीच्या एकूण २२ सामन्यातील ३६ डावात ४ शतके व ५ अर्ध शतके यांसह आतापर्यंत एकंदर ११८१ धावा केल्या आहेत. मागील वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), नाशिकने पुन्हा ९ वर्षांनी विजेतेपद पटकावले. या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत फलंदाजीत सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने पहिले स्थान पटकवताना ११ सामन्यातील १५ डावात ४ शतके व ६ अर्धशतकांसह तब्बल ९९८ धावा फटकावल्या. सर्वोच्च धावसंख्या होती १६७ . सरासरी ७६.७७, स्ट्राइक रेट ११३.२८. त्यात एकूण ३८ षटकार व १३८ चौकार .या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुर्तुझाने बहुमोल शतकी कामगिरी करत १०२ धावा केल्या होत्या. त्याबरोबरच हंगामा अखेरीस झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय एम पी एल – महाराष्ट्र प्रीमियर लीग – स्पर्धेत ही लक्षणीय कामगिरी केली होती . अशा फलंदाजीतील सगळ्या जोरदार कामगिरीमुळेच मागील काही हंगामात निवड न झालेल्या मुर्तुझाने निवड समितीचे लक्ष्य वेधून घेत महाराष्ट्र संघात विजय हजारे ट्रॉफी या एकदिवसीय स्पर्धेकरिता पुनरागमन केले आहे.
यासह नाशिक मध्येच सुरवतीपासून क्रिकेटचे धडे गिरवलेला , मूळचा नाशिककर खेळाडू रामकृष्ण घोष यानेही या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघात पदार्पण केले आहे.
विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेतील महाराष्ट्र संघाचा पुढील सामना २९ नोव्हेंबेर रोजी मेघालय संघाबरोबर होणार आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे, तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुर्तुझाचे अभिनंदन करून, स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.