एकतेचा महायज्ञ अर्थात महाकुंभ २०२5.

एकतेचा महायज्ञ अर्थात महाकुंभ २०२
संपादकीय.
१४४ वर्षांच्या नंतर २०२५ साली प्रयागराज इथे महाकुंभ मेळा होतो आहे. कुंभ , अर्धकुंभ आणि महाकुंभ मेळा यांचा उल्लेख आणि महात्म्य पुराणांमध्ये सुद्धा वर्णिले आहे. कुंभमेळ्याची पर्वणी साधून गंगेत स्नान करणाऱ्या भाविकांच्या समस्त पापांचा नाश होतो . त्यांच्या आणि त्यांच्या पितरांचा उद्धार होऊन त्यांना उत्तम गती प्राप्त होते अशी पौराणिक मान्यता आहे.
कुंभ मेळ्याची कथा.
महर्षी दुर्वासांनी समस्त देवांना शाप दिला त्यामुळे स्वर्ग श्रीहीन झाला. श्री या शब्दात २७ प्रकारच्या ऐश्वर्याचा समावेश आहे. स्वर्गातील हे समस्त ऐश्वर्य लोप पावल्याने देव हीनदीन होऊन विष्णूला शरण गेले. त्यांनी समुद्र मंथन करा त्यातून अमृत निघेल ते प्राशन करून तुम्ही अमर व्हाल असे सांगितले. देवांनी राक्षसांचा राजा बळी यालाही अमृताबद्दल सांगून त्याला पण समुद्र मंथन करण्यासाठी तयार केले. रवी होण्याची जबाबदारी मेरू पर्वताने स्वीकारली, दोरी होण्याची जबाबदारी वासुकी नागाने स्वीकारली. स्वतः विष्णूंनी कूर्म होऊन मेरू पर्वत आपल्या अंगावर घेतला जेणेकरून मंथनाला प्रारंभ होईल.
या समुद्र मंथनातून हलाहल विष प्रकट झाले जे महादेवांनी प्राशन करून जगताचे रक्षण केले. नंतर चौदा रत्ने प्राप्त झाली आणि शेवटी अमृत कुंभ निघाला. हा अमृत कुंभ मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरु झाले. विष्णूने गरुडाला हा कुंभ घेऊन जाण्यास सांगितले. गरुड तो घेऊन जाण्याचा प्रयास करत असताना कुंभातून चार अमृताचे थेंब सांडले आणि ते पृथ्वीवर चार ठिकाणी पडले.
पृथ्वीवरील ती चार पुण्यस्थाने ही कुंभमेळ्याची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहे. देव आणि दानवांचे युद्ध १२ दिवस चालले. अर्थात मानवांचे बारा वर्ष. त्यामुळे दर बारा वर्षांनी हा कुंभ मेळा या चार ठिकाणी एकापाठोपाठ एक असा होतो. दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हा अनुक्रमे प्रयागराज, त्या नंतर दोन वर्षांनी नाशिक, त्या नंतर एक वर्षाने उज्जैन आणि त्या नंतर पाच वर्षांनी हरिद्वार इथे होतो. अर्धकुंभ मेळा हा दर सहा वर्षांनी होतो आणि तो फक्त प्रयागराज आणि हरिद्वार इथे होतो. अर्थात बारा वर्षाच्या अंतराने होणाऱ्या दोन कुंभमेळ्यामध्ये एक अर्ध कुंभ मेळा होतो. महाकुंभ हा १४४ वर्षांनी येणारा योग असून बारा पूर्णकुंभ झाल्यावर एक महाकुंभमेळा होतो, हा महाकुंभमेळा फक्त प्रयागराज इथे होतो.
सनातन धर्म आणि संस्कृती ही जगातील सर्वाधिक परिपक्व परिपूर्ण आणि ज्ञानी लोकांनी निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था आहे हे सिद्ध करणारी घटना म्हणजे कुंभमेळा. जगाच्या पाठीवर तुम्हाला एकही अशी संस्कृती दिसणार नाही जी ग्रहांच्या स्थितीनुरूप सणांची किंवा सोहळ्याची योजना करेल. सांवत्सरिक आवर्तन आणि कालगणने नुरूप सण सगळेच लोक साजरे करतात. ख्रिस्ती लोक नाताळ किंवा नववर्ष हे ३६५ दिवसांच्या कालगणनेला प्रमाण मानून साजरे करत आहेत. त्यात दर चार वर्षांनी १ दिवसाची वधघट होते आणि ती सामावून घेण्यासाठी ते लीप इयर संकल्पना वापरत १ दिवस जोडतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी आकाशातील ग्रहांची स्थिती आणि नववर्षाची तारीख ही समान नसते. मुस्लिमांचे वर्षच आपल्या अकरा महिन्यांचे असते. त्यामुळे त्यांचे सगळे सण एक एक महिना मागे सरकत येतात आणि त्यांचा आणि अंतराळातील ग्रहांच्या स्थितीचा काहीही संबंधच येत नाही. त्यांच्याकडे ईद साठी चंद्र दर्शन होणे पुरेसे असते.
परंतु कुंभमेळा हा सूर्य , चंद्र आणि बृहस्पती ग्रह यांची परस्पर सापेक्ष आणि पुन्हा एकत्रित रूपाने पृथ्वीसापेक्ष असणारी स्थिती यानुसार आयोजित केला जातो. हे गणित आजचे नसून हजारो वर्ष याच पद्धतीने गणित करून हे सोहळे आयोजित केले जात आहेत. भारतीयांचे अॅस्ट्रोनॉमी अर्थात खगोलशास्त्रावरील असणाऱ्या प्रभुत्वाची साक्ष देणारी ही गोष्ट आहे. ३०० -४०० वर्षांच्या पूर्वी जेंव्हा पाश्चिमात्य जगतात सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवताली आवर्तन करते आहे हे सांगितल्याबद्दल शास्त्रज्ञ मंडळींना विषाचे प्याले रिचवावे लागत होते त्याकाळात सुद्धा आपल्याकडे कुंभमेळे होत होते. १४०० वर्षांपासून वाळवंटातील संप्रदायाचे अनुयायी पृथ्वीला सपाट म्हणत होते त्यावेळी सुद्धा आपल्याकडे कुंभमेळे होत होते.
सूर्य ,चंद्र आणि बृहस्पती अर्थात गुरुग्रहाची पृथ्वीसापेक्ष स्थिती यावर कुंभमेळ्याची स्थलकालनिश्चिती होत असते.
• गुरु ग्रह हा वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत आल्यावर होणारा कुंभमेळा हा प्रयागराज इथे होतो. असे बारा पूर्णकुंभ मेळे झाले की एक महाकुंभ मेळा होतो. यावर्षीचा कुंभमेळा हा महाकुंभ आहे. प्रयागराज इथला कुंभ गंगा , यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणीसंगमावर होतो.
• गुरु ग्रह कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असेल त्यावेळी होणारा कुंभमेळा हा हरिद्वार मध्ये होतो. हरिद्वारचा कुंभमेळा गंगा नदीच्या किनाऱ्यावर आयोजित केला जातो.
• गुरु ग्रह आणि सूर्य असे दोन्ही ग्रह ज्यावेळी सिंह राशीत असतात त्यावेळी होणारा कुंभमेळा हा सिंहस्थ कुंभ म्हणून ओळखला जातो आणि त्याचे आयोजन नाशिक मध्ये केले जाते. नाशिक इथे गोदावरी नदीच्या तटावर कुंभमेळा आयोजित केला जातो.
• ज्यावेळी गुरु ग्रह हा सिंह राशीत असेल आणि सूर्य मेष राशीत असेल त्यावेळी उज्जैन इथे कुंभमेळा होतो. उज्जैनला क्षिप्रा नदीच्या तीरावर कुंभमेळा आयोजित केला जातो.
महाकुंभमेळा प्रयागराज २०२५ च्या आयोजनासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकारने प्रचंड तयारी केली आहे. यावर्षीच्या कुंभमेळ्यात साधारण ४० कोटी भाविक स्नान करायला येतील अशी अपेक्षा आहे आणि इतक्या प्रचंड गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे, त्यांना योग्य सोयीसुविधा प्रदान करणे आणि स्वच्छ, सुरक्षित पद्धतीने सोहळा पार पाडणे हे शिवधनुष्य पेलण्यास योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार सुसज्ज आहे. एक अस्थाई शहर वसवले गेले आहे. प्लास्टिक मुक्त कुंभमेळा व्हावा म्हणून येणाऱ्या सर्व साधू संन्यासी मंडळींना एक ताट, वाटी आणि तांब्या दिला गेला आहे जेणेकरून त्यांना भोजन करताना प्लास्टिक च्या वस्तू वापरण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही पद्धतीचा अपघात होऊ नये म्हणून उच्चप्रशिक्षित एनडीआरएफची टीम नेमली गेली आहे.
एकूण कुंभ मेळ्याचा कालावधी हा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असला तरी काही मुख्य तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
14 जनवरी 2025 – मकर संक्रांति
29 जनवरी 2025 – मौनी अमावस्या
3 फरवरी 2025 – वसंत पंचमी
12 फरवरी 2025 – माघी पोर्णिमा
26 फरवरी 2025 – महाशिवरात्रि.
या दिवशी शाही स्नान होणार असून या पाच दिवसांना पर्वणी असे संबोधले जाते. परंतु या संपूर्ण कालखंडात त्रिवेणी संगमावर कुठेही स्नान करणे हे पुण्यप्रदायकच आहे.
कुंभमेळ्याचे सर्वाधिक महत्व हे साधू संन्यासी आणि त्यांच्या सांप्रदायिक आखाड्यांसाठी असते. या काळात संन्यास धारण केला जातो. हिंदू धर्मातील सर्व संप्रदाय , सर्व पीठ आणि सर्व मार्गांची साधू संन्यासी आणि गुरु मंडळी डेरेदाखल होतात. त्यांच्यासह त्यांच्या शिष्यांचा समुदाय असतो. आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले दशनामी आखाड्याचे साधू पण कुंभमेळ्याला येतात. यात अघोरी , नागा , कापालिक, हटयोगी मंडळी सुद्धा समाविष्ट असते. हे सगळे साधू संन्यासी आपल्या गुरूची भेट घेणे , १२ वर्षात संन्यास घेतल्यावर आलेले अनुभव, प्राप्त केलेल्या सिद्धी आणि पुढील १२ वर्षात काय साधना करायचे याचे मार्गदर्शन घेण्यासाठी हे साधू आलेले असतात. गुरूंचे मार्गदर्शन , पापक्षालन आणि गुरूंची व गुरुबंधुंची भेट, त्यांच्यासह शाही स्नान करणे ,पुन्हा आपल्या तपस्या जगतात परत जाणे हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचे तर कुंभमेळा हे साधू संन्यासी मंडळींचे री युनियन असते. दशनामी आखाड्यातील साधू शस्त्र बाळगून असतात आणि त्याबद्दल सामान्य लोकांना कुतूहल असते , पुरोगामी लोकांना संताप असतो. परंतु दशनामी आखाडा परंपरा आदि शंकराचार्यांनी सुरु करण्याचे कारणच धर्मरक्षण हे होते. भविष्यात धर्मावर आक्रमण झाले तर हे दशनामी परंपरेतील साधू राजाच्या सैन्याला मदत करायला येतील आणि प्राण जाईपर्यंत लढा देतील हे यामागील मुख्य सूत्र होते. नागा , गोसावी आणि अनेक साधूंनी वेळोवेळी उत्तर भारतातील राजसत्तांना मुघलांशी लढताना मदत केली आहे आणि प्राण जाईतो लढून मुघलांचे आक्रमण रोखले आहे आणि हा ईतिहास आहे.
संयुक्त राष्ट्रांनी कुंभमेळ्याची नोंद जगातील सर्वात अद्भुत सोहळा अशी केली असून हे जगातील हे सर्वात मोठे धार्मिक एकत्रीकरण मानले जाते. या वर्षी जगभरातील एकूण ४० कोटी नागरिक या सोहळ्याला भेट देणार असून ८० देशांचे राष्ट्रप्रमुख सुद्धा भेट देण्याची शक्यता आहे. ‘सर्वसिद्धिप्रदः कुम्भः’ अशी सार्थ उद्घोषणा असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाकुंभ २०२५ चा उल्लेख एकतेचा महायज्ञ असा केला आहे.
सनातन धर्माचे सांस्कृतिक , वैज्ञानिक आणि प्राकृतिक ज्ञानाचे आणि वैभवाचे हे सर्वात मोठे प्रकटीकरण आहे आणि या सोहळ्याला भव्य दिव्य आणि डोळ्यांचे पारणे फिटावे असा करण्यासाठी मोदी सरकार आणि योगी सरकार अक्षरशः रात्रीचा दिवस करत आहेत. भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रपुरुषाचे हे विराट स्वरूप जगात अनाचार माजवणाऱ्या समस्त एकेश्वरवादी विकृतींना त्यांची लायकी दाखवणारे सिद्ध होईल यात संशय नाही.