ब्रेकिंग

अपघात होणार नाही यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात. पालकमंत्री दादा भुसे.

 

 

*अपघात होणार नाही यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात*

*- पालकमंत्री दादाजी भुसे*

 

*नाशिक  जनमत: दिनांक 11 ऑक्टोबर, 2022

नाशिक येथे शनिवारी झालेल्या बस अपघाताचे गांभीर्य लक्षात घेवून रस्ते सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून कामे करावीत जेणे करून अपघात होणार नाहीत, त्यादृष्टिने आवश्यकत्या शाश्वत उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील विविध रस्ते, महामार्गावरील अपघात, ब्लॅकस्पॉट व रस्ते सुरक्षितता बाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत श्री भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रशेखर पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मालेगाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शाश्वत उपाययोजना करून वाहतुक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अवजड वाहनांसाठी असलेल्या वाहतुक नियमांची जनजागृती करण्याकरिता टोल नाक्यांवर वारंवार संदेशांचे प्रसारण करण्यात यावे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला रस्त्याच्या लेनच्या शिस्तीचे पालन करणे अनिवार्य करण्यात यावे. यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच यंत्रणांमधील मनुष्यबळ समांतररित्या टोल नाक्यावर देण्यात येऊन साधारण एक महिनाच्या कालावधीसाठी हा उपक्रम मोहीमस्तरावर राबविण्यात यावा, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

 

रस्त्यावर लावण्यात आलेले सिग्नल लाल आहे किंवा कसे लांबून दिसण्यासाठी मुंबई, पुणे येथे ज्याप्रमाणे संपूर्ण सिग्नालचा स्तंभ लाल रंगात चकाकतो त्याप्रमाणे काही नियोजन करता येईल का? त्‍यासाठी ही विचार करावा. जिल्ह्यातील रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आवश्यक त्याठिकाणी व नियमांनुसार थर्मोप्लास्टिक पेंट, रम्बलर आणि अनुषंगिक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका यांनी एकत्रितपणे काम करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील रस्त्यांची कामे चोखपणे करून अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न पूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

 

बैठकीच्या वेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी रस्ता सुरक्षा, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, ब्लॅक स्पॉट याविषयी करण्यात आलेल्या कामांची माहिती सादरीकरणाद्वारे पालकमंत्री श्री भुसे यांना दिली.

 

*मयत पोलीस पाटीलांच्या वारसांना मदत निधीचे वितरण*

बैठकीच्या सुरूवातीला जिल्ह्यातील कर्तव्य बजावतांना कोरोनाने मृत्यू झालेल्या 4 पोलिस पाटलांच्या वारसांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या धनादेश वाटप करण्यात आले.

 

*यांच्या वारसांना मिळाली मदत*

१) दिवंगत सुयोग जगन्नाथ शिंदे, पोलीस पाटील, लक्ष्मणपुर; झापवाडी, तालुका; सिन्नर

२) दिवंगत पंढरीनाथ देवराम चव्हाण, पोलीस पाटील, पुणदनगर, तालुका कळवण

३) दिवंगत पांडुरंग बहिरु कवटे, पोलीस पाटील, शिवडे, तालुका सिन्नर

४) दिवंगत केशव बाळकृष्ण रुमणे, पोलीस पाटील, चेहडी, तालुका निफाड

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे