महिला सुरक्षा प्रश्नावर तात्काळ लक्ष घालून आयुक्त कारवाई करणार.
नाशिक प्रतिनिधी :नाशिक जनमत. पोलीस आयुक्तालयातर्फे जारी करण्यात आलेल्या व्हाट्स अप क्रमांकावर काही तक्रार आल्यास त्यावर तात्काळ कारवाही होते तसेच महिला सुरक्षेसंदर्भात काही तक्रार असल्यास मी स्वतः त्याचा पाठपुरावा करतो असे मत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केले.
आमदार सिमा हिरे यांच्या संकल्पनेतून नाशिक पश्चिम मतदार संघातील महापालिका व खासगी शाळांचे मुख्यध्यापक व खासगी कोचिंग क्लास च्या संचालकांसोबत राज्यात सुरु असलेल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा निषेध व याबाबत पोलिसांचे व मानसोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक बोलत होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले कि,आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यावर पूर्वी सुरु असलेली क्यू आर कोड ची संकल्पना बंद करून जीपीएस ची नवीन संकल्पना अमलात आणली त्यामुळे अंमलदाराला घटना स्थळावर जावेच लागते.शाळेच्या किंवा खासगी क्लासच्या बाहेर कुणी उपद्रव करत असेल किंवा तिथे टवाळखोरांचा काही त्रास असेल तर सीपी व्हाट्स अप क्रमांकावर तक्रार करा त्याच्यावर तात्काळ कारवाही करण्यात येईल. यासोबतच काही आपत्काल परिस्थितीमध्ये ११२ या पोलीस हेल्प लाईन वर संपर्क करावा. जो पर्यंत तुम्ही डिमांड करत नाही तोपर्यंत काही कारवाई करणे शक्य होत नाही. जेवढी मागणी कराल तेवढी चांगली सुविधा देण्यात येईल.
यावेळी बोलतांना आ. सिमा हिरे म्हणाल्या कि, बदलापूर व कलकत्त्याच्या घटनांचे पडसाद संपूर्ण राज्यात पसरले असतांना नवीन नाशकात एका खासगी क्लासवर पाचवीच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला अशा घटना निदनीय आहेत. या पुढच्या काळात शाळा व महाविद्यालयातील मुलींची व महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायची गरज आहे.काही वाईट घटना घडली कि मुलांसह त्यांच्या पालकांवरही मानसिक परिणाम होतात त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल याकडे शाळांतील व खासगी क्लासच्या शिक्षकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बऱ्याच शाळांच्या बाहेर टवाळखोरांचा त्रास होत असतो त्यामुळे शाळांच्या गेटवर दामिनी पथकाची गस्त वाढविण्याची गरज आहे. पालक प्रत्येक वेळी मुलांसोबत असतील असे नाही त्यामुळे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे शिकवले पाहिजे त्यामुळे मुलींमधील आत्मविश्वास वाढेल. आ. हिरे पुढे म्हणाल्या कि,मुंबईच्या धर्तीवर नाशकताही पोलिसांनी शाळेच्या भेटी घेत शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद करावा त्यामुळे मुलांमध्ये सुरक्षेची भावना देखील निर्माण होईल. शिक्षकांनी मुलामुलींमध्ये भेदभाव न ठेवता त्यांना समान दर्जा द्यावा.
यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,आ.सिमा हिरे,उपायुक्त मोनिका राऊत,महापालिका शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील,सातपूर वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे,गंगापूर वरिष्ठ निरीक्षक सुनील जुमडे,उपनिरीक्षक सविता उंडे,भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव,रोहिणी नायडू,बाळासाहेब पाटील,रश्मी हिरे बेंडाळे,रवी पाटील आदी उपस्थित होते.