एकात्मिक फलोउत्पादन अभियानअंतर्गत प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
दिनांक: 6 ऑक्टोबर, 2022*
एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी
शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
– गोकुळ वाघ
नाशिक, दिनांक: 6 ऑक्टोबर, 2022
एकात्मिक फलोत्पादन अभियान 2022-23 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 11 ऑक्टोबर, 2022 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य फालोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या मार्फत उपविभाग कृषी अधिकारी यांच्या उपविभाग कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना उपविभाग पुणे, कोल्हापूर, वाई, फलटन, बारामती व श्रीरामपूर येथे 5 दिवसाचे प्रक्षेत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणांतर्गत महिला शेतकरी, शेतकरी गट, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी यांना सहभाग घेता येणार असून यासाठी इच्छुकांनी आपले अर्ज उपविभागीय कृषी अधिकारी, नाशिक यांच्याकडे सादर करावेत. तसेच अर्जासोबत 7/12 उतारा, आधारकार्ड व संपर्क क्रमांक देणे आवश्यक असणार आहे.
त्याचप्रमाणे लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 12 ऑक्टोबर, 2022 रोजी उपविभागीय स्तरावर सोडत काढून ज्येष्ठता सूचीनुसार प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांना प्रक्षेत्र प्रशिक्षणाची तारीख व स्वरूप तालुका स्तरावरून कळविण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी श्री वाघ यांनी दिली.