उन्नत नाशिक अभियान अंतर्गत नाशिक मनपाची ‘झिरो ब्लॅक स्पॉट ड्राईव्ह’ प्रभावी; हाय रिस्क ब्लॅक स्पॉट हटविला*

*उन्नत नाशिक अभियान अंतर्गत नाशिक मनपाची ‘झिरो ब्लॅक स्पॉट ड्राईव्ह’ प्रभावी; हाय रिस्क ब्लॅक स्पॉट हटविला*
नाशिकजनमत महानगरपालिका, स्वच्छ भारत अभियान व “उन्नत नाशिक अभियान” अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात ‘झिरो ब्लॅक स्पॉट ड्राईव्ह’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
शहरातील अस्वच्छता निर्मूलनासाठी प्रशासनाकडून सातत्याने विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. शहरातील विविध स्वयंसेवी संघटना व नागरिकांकडून संबंधित परिसरातील अस्वच्छता व कचरा साठ्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून तात्काळ कारवाई करत गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रा नजीक, डीजीपी नगर क्र. १ रस्ता, नाशिक–पुणे रस्ता परिसरातील प्रभाग क्रमांक २३ नाशिक पूर्व विभागातील हाय रिस्क ब्लॅक स्पॉट हटविण्यात आला.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, टाकाऊ साहित्य व इतर घनकचरा साफ करून परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. ब्लॅक स्पॉट हटविल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये यासाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
*स्वच्छतेबाबत जनजागृती संदेशांद्वारे*
परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आकर्षक वॉल पेंटिंग करण्यात आले असून “ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा”, “सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका” तसेच “स्वच्छ परिसर हीच खरी जबाबदारी” अशा संदेशांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख रस्ते,चौक, मोकळी मैदाने, नदीकाठ परिसर व वारंवार कचरा टाकला जाणारे हाय रिस्क स्पॉट ओळखून ते कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी नियमित स्वच्छता, फवारणी, जनजागृती उपक्रम तसेच आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मनपाच्या वतीने करण्यात आलेल्या तात्काळ व प्रभावी कारवाईबद्दल शहरातील विविध स्वयंसेवी संघटना, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या कार्याचे कौतुक केले असून, शहर स्वच्छता व जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या “झिरो ब्लॅक स्पॉट ड्राईव्ह” उपक्रमाचे स्वागत केले आहे. महानगरपालिकेने अशाच प्रकारे सातत्याने कारवाई करून शहरातील इतर अस्वच्छ ठिकाणे देखील स्वच्छ करावीत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
*मनपा पदाधिकारी अधिकारी यांचे कडून स्वच्छतेबाबत आवाहन*
महापौर हिमगौरी आहेर-आडके,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री,अतिरिक्त आयुक्त अमित रंजन तसेच मनपा पदाधिकारी,सर्व स्थानिक नगरसेवक यांनी नागरिकांना आवाहन केले की, नाशिक ही धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेली देवभूमी असून शहराचे पावित्र्य, स्वच्छता व सौंदर्य जपणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.नागरिकांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता घंटागाडीतच द्यावा तसेच स्वच्छते बाबत महानगरपालिकेस सहकार्य करावे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विभागांमध्ये अशा प्रकारच्या ‘झिरो ब्लॅक स्पॉट ड्राईव्ह’ सातत्याने राबवित असून “स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी दिली.



