आता मविप्र रुग्णालयात विनामूल्य होणार किडनी, लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया* –
उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मविप्रचा दिलासा : ॲड. नितीन ठाकरे* नाशिक जनमत ऑनलाईन पोर्टल ताज्या

*आता मविप्र रुग्णालयात विनामूल्य होणार किडनी, लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया*
————————————-
*उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मविप्रचा दिलासा : ॲड. नितीन ठाकरे*
————————————-
*नाशिक जनमत :* मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये आता किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असून, नुकतीच आईने मुलाला दिलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य या दोन्ही योजनांच्या अंतर्गत या शस्त्रक्रिया विनामूल्य होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासादायी बाब असून, जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व कार्यकारिणी मंडळाने पत्रकार परिषदेत केले.
आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये मंगळवारी (दि.१२) आयोजित या पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी रुग्णालयाच्या या नवीन विभागांची माहिती दिली. याप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी डी. लोखंडे, प्रा. शशिकांत मोगल, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, किडनी प्रत्यारोपण समन्वयक डॉ. संजय रकिबे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ॲड. ठाकरे म्हणाले की, मविप्र रुग्णालयात मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. येथे अत्याधुनिक डायलिसिस युनिटसह तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, भूलतज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग सेवेत दाखल झाला आहे. आतापर्यंत आईने मुलाला किंवा वडिलांनी मुलाला, आजीने नातवाला अशा रक्ताच्या नात्यातील शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे, या महागड्या शस्त्रक्रिया ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य’ आणि ‘प्रधानमंत्री आयुष्यमान भारत अशा शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. आगामी दोन-तीन महिन्यांत आणखी ५ ते ७ शस्त्रक्रियांचे नियोजन असून, त्यासाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच मविप्र रुग्णालयात लवकरच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचादेखील मानस आहे. त्यासाठीच्या तज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा झाली असून, शासनाची परवानगी मिळाल्यानंतर लवकरच ही सुविधादेखील मविप्र रुग्णालयात उपलब्ध होणार आहे, तसेच, स्पोर्ट फ़िजिओथेरपी, होमिओपॅथी हे विभागदेखील लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
————————————————
*आईने मुलाला दिले जीवदान*
मविप्र रुग्णालयात नुकत्याच पार पडलेल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील रुग्ण रोशन बच्छाव (मुलगा), मनिषा बच्छाव (आई) आणि विनायक बच्छाव (वडील) यांचा मविप्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. विवाहाच्या अवघ्या १५ दिवसांत रोशनची किडनी केवळ १० टक्केच कार्यान्वित असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले. त्यानंतर आईने मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. मविप्र रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्व टीमने घेतलेल्या अपार मेहनतीनंतर या दोघा मायलेकांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या.
————————————————
*नाव नोंदणीचे आवाहन*
ज्या रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज आहे, परंतु रक्ताच्या नात्यातील दाता किंवा जवळचा दाता उपलब्ध होत नाही, अशा रुग्णांनी ‘झेडटीसीसी’कडे (ZTCC) नाव नोंदणी करावी. अशा रुग्णांना मेंदूमृत रुग्णांकडून मिळणारे मूत्रपिंड उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी मविप्र रुग्णालय पूर्ण सहकार्य करेल. भारतामध्ये सध्या ५ लाखांहून अधिक रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे समाजाने मेंदू मृत्यूनंतर अवयव दानासाठी पुढे यावे, यासाठी रुग्णालयामार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व समुपदेशन केले जात असल्याची माहिती ॲड.ठाकरे यांनी दिली.
————————————————
*सिडको परिसरात ओपीडी सुरु*
नाशिक शहरातील सिडको परिसरातील नागरिकांना माफक दरात आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मविप्र संस्थेच्या वतीने उत्तमनगर येथील ‘जनशिक्षण संस्थान’च्या इमारतीत बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आता अगदी जवळ आणि वेळेवर मिळणे सोपे झाले आहे. ही ओपीडी सोमवार ते शनिवार सार्वजनिक सुट्ट्या वगळून सुरू असते. सामान्य ओपीडी सेवा दिवसभर उपलब्ध असून, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत तर ओपीडी सायंकाळी ५:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत होते. या केंद्रामध्ये विविध आजारांवर उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे, ओपीडी केसपेपर, ईसीजी, रक्तातील साखर तपासणी विनामूल्य तर याव्यतिरिक्त, प्रयोगशाळेतील इतर सर्व तपासण्या अत्यंत माफक दरात केल्या जातात. ज्या रुग्णांना अधिक उपचारांची किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांना मविप्रच्या ‘डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात संदर्भित केले जाते. विशेष म्हणजे, अशा रुग्णांसाठी सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
————————————————
*शैक्षणिक विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल*
डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाने शैक्षणिक विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल टाकले असून, महाविद्यालयातील एमबीबीएस (MBBS) पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १२० विद्यार्थी क्षमता असलेल्या या अभ्यासक्रमासाठी आता १५० जागांना मंजुरी मिळाली आहे. एमबीबीएस (MBBS) पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये १५० हून २५० जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमात मेडिसिन, रेडिओलॉजी आणि मानसरोग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांतील जागा वाढवण्यासाठी सध्या प्रशासकीय स्तरावर मान्यता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
————————————————
*सुपर स्पेशलिटी कोर्सेस सुरू करणार*
ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयात लवकरच सुपर स्पेशलिटी कोर्सेस सुरू करण्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. ‘जागा वाढल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळेल. तसेच नवीन कोर्सेसमुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल,तसेच जिल्ह्याच्या व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थान अधिक बळकट होणार असून, दर्जेदार आरोग्य सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर घडवण्यास मोठी मदत होणार आहे. असेही सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी सांगितले.
————————————————
*आदिवासी कुटुंबाचा अवयवदानाचा आदर्श*
सटाणा तालुक्यातील गोलवाड येथील १४ वर्षीय विकास यशवंत महाले हा युवक मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता, त्याच्यावर डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र मेंदूला गंभीर दुखापत झाली होती, तीन दिवस डॉक्टरांनी त्याचे जीव वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र तो ब्रेनडेड झाला. मविप्र रुग्णालयातील ब्रेन डेड कमिटीने तपासणी करून ब्रेन डेड ची घोषणा केली. त्यानंतर अवयवदानाबाबत विकासच्या कुटुंबियांचे समुपदेशन करत अवयवदानाचे महत्व समजून सांगीतले. आणि त्यानंतर एका आदिवासी भागातील सर्वसामान्य कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला, आणि वेगवेगळी चार पथकं अहोरात्र या प्रक्रियेत झटली . ही घटना अतिशय दुर्मिळ असून एका आदिवासी कुटुंबाने त्यांच्या १४ वर्षीय मेंदूमृत मुलाचे अवयव दान करून प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. भारतात लहान मुलांचे अवयव दान होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असताना, या अशिक्षित कुटुंबाने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे. या मुलाचे अवयव यकृत आणि दोन मूत्रपिंड पुणे येथे आणि नेत्र व त्वचा नाशिकमधील गरजूंना जीवनदान देण्यासाठी वापरण्यात आले.
————————————————
*‘त्या’ कुटुंबाला मदतीचा हात*
मविप्र रुग्णालयात गेल्या आठवड्यात घडलेल्या दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना मविप्रने मदतीचा हात पुढे केला आहे. तात्काळ मदत म्हणून माविप्रकडून १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. पीएफच्या माध्यमातून ६ हजार रुपये पेंशांदेखील सुरु केली जाणार आहे. कुटुंबातील वारसाला नोकरी देण्यासाठीदेखील प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी दिली.
————————————————
*फोटो कॅप्शन*
*1) नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये ज्या मायलेकावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली, त्या कुटुंबाचा सत्कार करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी डी. लोखंडे, प्रा. शशिकांत मोगल, रुअधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, किडनी प्रत्यारोपण समन्वयक डॉ. संजय रकिबे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश जाधव आदी.*
——————————-
2 *) नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी डी. लोखंडे, प्रा. शशिकांत मोगल, रुअधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे.*

