कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नाशिक महानगरपालिके तर्फे आर्थिक मदत..

कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नाशिक महानगरपालिके तर्फे आर्थिक मदतीच्या स्वरूपात मदत
नाशिक जनमत महानगरपालिकेच्या वतीने कोविड-१९ महामारीच्या काळात कोविड कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी रुपये ५० लाख इतकी आर्थिक मदत धनादेश स्वरूपात प्रदान करण्यात आली आहे. या अनुषंगाने एकूण २१ प्राप्त प्रस्तावा पैकी १० कुटुंबांना प्रथम टप्प्यात प्रत्येकी रुपये ५० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.उर्वरित पात्र कुटुंबांना चालू आर्थिक वर्षात,टप्प्याटप्प्याने ही मदत वितरित करण्यात येणार आहे.सदर धनादेश माननीय महापौर श्रीमती हिमगौरी आडके-आहेर यांच्या हस्ते दि १६ एप्रिल २०२६ रोजी प्रदान करण्यात आले. यावेळी माननीय उपमहापौर श्री.विलास शिंदे ,माननीय स्थायी समिती सभापती श्री.मच्छिन्द्र सानप ,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देवकर,मुख्य वित्त व लेखा अधिकारी, श्री .दत्तात्रय पाथरूट,मुख्य लेखा परीक्षक श्री.बळवंत गायकवाड, तसेच नाशिक महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माननीय महापौर व उपमहापौर यांनी उपस्थितांना संबोधित करताना कोविड काळात महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अतुलनीय सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली तसेच महानगरपालिका त्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी राहील, असा विश्वास दिला.कोविड महामारीच्या अत्यंत कठीण काळात महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत होते. त्यांच्या या अतुलनीय सेवेला आणि बलिदानाला मानाचा मुजरा म्हणून नाशिक महानगरपालिका त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.ही आर्थिक मदत केवळ सहाय्य नसून, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल आहे. महानगरपालिका प्रशासन भविष्यातही अशा कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहील असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
मा.आयुक्त श्रीमती.मनिषा खत्री, मा.अतिरिक्त आयुक्त श्री अमित रंजन व श्री प्रदीप चौधरी तसेच तत्कालीन मा.अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली हि संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली असून, संबंधित कुटूंबाना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रशासनाने विशेष प्रयन्त केले.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देवकर यांनी यावेळेस सर्व मान्यवरांचे आभार मानले.


