ब्रेकिंग

अवयवदानाचा महात्याग!* *ऐन दिवाळीत माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा*

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय!*

*अवयवदानाचा महात्याग!*

*ऐन दिवाळीत माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा*

 

*पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय!*

 

नाशिक : जनमत   दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या आशांचा सण! मात्र, याच दिवाळीत एका कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचा काळोख पसरला. ज्या हातात हात घालून आयुष्याची स्वप्ने रंगवली, तोच जीवनसाथी अचानक काळाच्या पडद्याआड गेला. पण या असह्य दुःखाच्या क्षणीही माणुसकीचा दिवा विझू न देता नांदूरमधमेश्वर येथील माळी कुटुंबाने घेतलेला अवयवदानाचा निर्णय अनेकांच्या आयुष्यात नव्या आशेचा प्रकाश घेऊन आला.

 

नांदूरमधमेश्वर येथील शेतमजूर कुटुंबातील रावसाहेब माळी या तरुणाचा रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मेंदूमृत झाला. एका क्षणात संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले. पतीला गमावण्याचे दुःख सहन करणाऱ्या पत्नीसमोर आणि आपल्या मुलाला गमावलेल्या आई-वडिलांसमोर आयुष्यातील सर्वांत कठीण प्रसंग उभा होता. मात्र, या दुःखाच्या डोंगराखालीही त्यांनी माणुसकीचा हात सोडला नाही.

 

नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रावसाहेब यांना पुढील उपचारासाठी आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र दुर्दैवाने त्यांचा मेंदूमृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

 

या कठीणप्रसंगी अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी शासनाच्या झेडटीसीसीच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबीयांचे समुपदेशन केले. अवयवदानाचे महत्त्व आणि त्यातून अनेकांना मिळू शकणारे जीवन याची माहिती गमावण्याचे दुःख ताजे असतानाही पत्नी मीना माळी, आई-वडील आणि नातेवाईकांनी अवयवदानास संमती दिली. हा केवळ एक निर्णय नव्हता, तर स्वतःच्या दुःखापलीकडे जाऊन दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा विलक्षण त्याग होता.

 

“माझ्या आयुष्यात या दिवाळीत अंधार आला आहे; पण माझ्या पतीच्या अवयवांमुळे इतरांच्या आयुष्यात प्रकाश पडणार असेल, तर त्यापेक्षा मोठे समाधान कोणते? माझ्या पतीच्या शरीराची माती किंवा राख करण्यापेक्षा त्याच्या अवयवांमुळे कुणाला तरी नवे जीवन मिळावे, हीच माझी इच्छा आहे!”

— मीना माळी, दिवंगत रावसाहेब माळी यांच्या पत्नी

 

या शब्दांतून एका पत्नीचे दुःख, तिचे धैर्य आणि तिच्या मनातील माणुसकीची उंची व्यक्त होते. पतीच्या जाण्याने आयुष्यभराची पोकळी निर्माण झाली असतानाही तिने अनेक अनोळखी कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला.

 

कुटुंबीयांच्या संमतीनंतर आज पहाटे साडेचार ते सकाळी दहा वाजेपर्यंत अवघ्या साडेपाच तासांत अत्यंत गुंतागुंतीची अवयवदान व अवयवप्रत्यारोपणासाठी अवयव संकलनाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

रावसाहेब यांच्या अवयवांमुळे अनेकांना मिळणार नवजीवन!

 

– हृदय – एअर कॉरिडॉरद्वारे मुंबई येथील एच. एन. रुग्णालयात रवाना.

– यकृत – पुणे येथे प्रत्यारोपणासाठी रवाना.

– एक मूत्रपिंड – मविप्र रुग्णालय, आडगाव येथे.

– दुसरे मूत्रपिंड – नाइन पर्ल हॉस्पिटल, नाशिक येथे.

– नेत्र – मविप्र रुग्णालय, आडगाव येथे.

– त्वचा – नेहेते रुग्णालय, नाशिक येथे दान.

या संपूर्ण प्रक्रियेत मविप्र रुग्णालयातील मेडिसिन विभाग, सर्जरी विभाग, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, परिचारिका आणि सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अवयवांचे वेळेत संकलन आणि सुरक्षित वाहतूक होण्यासाठी नाशिक शहर पोलीस, आडगाव पोलीस ठाणे तसेच विमानतळ प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे आणि अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

 

महत्त्वाची प्रतिक्रिया

 

रावसाहेब यांचा अपघातात दुर्दैवी मेंदूमृत झाला. एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांच्या पत्नी, आई-वडील आणि नातेवाईकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय अत्यंत समाजोपयोगी, प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे.

*— ॲड. नितीन ठाकरे,* सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज

 

*शरीर नश्वर आहे; पण माणुसकी अमर आहे!*

 

दिवाळीच्या या प्रकाशपर्वात माळी कुटुंबाने दाखवून दिले की, खरा प्रकाश केवळ पणत्यांमध्ये नसतो, तो माणसाच्या विचारांत आणि कृतीत असतो. रावसाहेब आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या अवयवांमधून ते अनेकांच्या हृदयात धडकत राहतील, अनेकांना श्वास देत राहतील आणि अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची पहाट घेऊन येतील.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे