प्रभाग क्र. १ म्हसरूळ दिंडोरी रोड पंचवटी येथे महापौर व उपमहापौरांचा पाहणी दौरा. सीता सरोवराचा विकास, रस्त्यांची सुधारणा व मूलभूत सुविधांवर भर
महापौरांनी अधिकाऱ्यांना केल्या समस्या दूर करण्याच्या सूचना

प्रभाग क्र. १ म्हसरूळ दिंडोरी रोड पंचवटी येथे महापौर व उपमहापौरांचा पाहणी दौरा.
सीता सरोवराचा विकास, रस्त्यांची सुधारणा व मूलभूत सुविधांवर भर
नाशिक जनमत प्रतिनिधी शहरातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महापौर सौ. हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर श्री. विलास शिंदे यांनी प्रभागनिहाय पाहणी दौऱ्यास प्रारंभ केला. या उपक्रमाची सुरुवात प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) येथून करण्यात आली.

या दौऱ्यात स्थानिक नगरसेविका व माजी महापौर सौ. रंजना भानसी, नगरसेवक श्री. प्रवीण जाधव, नगरसेविका सौ. दीपाली गिते तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिसरातील विविध समस्या मांडल्या.
दौऱ्यादरम्यान नागरिकांकडून रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, उद्यानांची स्वच्छता, महापालिका शाळेच्या इमारतीची जीर्ण अवस्था अशा विविध मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. महापौर व उपमहापौरांनी अनेक बाबींवर तात्काळ आदेश देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी म्हसरूळ येथील प्राचीन सीता सरोवराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कॉलनीतील रस्त्यांची सुधारणा, आडगाव-वरवंडी-दिंडोरी रोडचे रुंदीकरण, तसेच पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या तीन ते सहा महिन्यांत पाणीप्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी खेडे विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून स्वच्छता विभागातील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा तुलनात्मक आढावा घेण्यात येणार आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीच्या तक्रारी लक्षात घेता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचेही निर्देश देण्यात आले.
पंचवटी म्हसरूळ येथील महापालिका शाळेच्या इमारतीत सुरू असलेल्या एका आधार केंद्राकडे आवश्यक परवानग्या नसल्याचे आढळून आल्याने महापौरांनी ते केंद्र तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यानुसार केंद्र बंद केले.

तसेच महापालिका शाळेची इमारत जीर्ण झाल्याने नवीन शाळा इमारत उभारण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १ साठी विशेष टँकर सेवा उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
दौऱ्यादरम्यान महापौर व उपमहापौरांनी कुलकर्णी उद्यान, ओमकारनगर, सीता सरोवर परिसर, म्हसरूळ भाजी बाजार, महापालिका शाळा तसेच रिलायन्स पेट्रोल पंप परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी महापौर सौ. हिमगौरी आहेर-आडके म्हणाल्या की, “नागरिकांना वारंवार महापालिकेत येण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही स्वतः त्यांच्या परिसरात जाऊन समस्या जाणून घेत आहोत. संबंधित अधिकारीही सोबत असल्याने तात्काळ उपाययोजना करण्याचा केल्या जाणार आहेत.”
उपमहापौर श्री. विलास शिंदे म्हणाले की, “नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. प्रभागातील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.”
माजी महापौर तथा नगरसेविका रंजना भानसी नगरसेविका दिपाली गीते नगरसेवक श्री. प्रवीण जाधव यांनीही परिसरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा व उद्यानांच्या देखभालीबाबत नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे दौऱ्या दरम्यान सांगितले.


