आरोग्य व शिक्षण

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर “गुढी पाडवा प्रवेश वाढवा अभियान” शिक्षकांचा घराघरांत संवाद.

– गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर “गुढी पाडवा प्रवेश वाढवा अभियान” शिक्षकांचा घराघरांत संवाद.

नाशिक जनमत   नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शाळाबाह्य व गळती विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे तसेच “१०० टक्के प्रवेश” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष “गुढी पाडवा प्रवेश वाढवा” अभियान राबविण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अभियानाला अधिक गती देत शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकारी पालकांशी थेट संवाद साधत घराघरांत जाऊन प्रवेश नोंदणीसाठी जनजागृती करत आहेत.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक व आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्मार्ट स्कूल संकल्पनेअंतर्गत अनेक शाळांमध्ये सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, स्मार्ट बोर्ड आधारित डिजिटल शिक्षण, कृतीयुक्त अध्यापन पद्धती, तसेच शासनमान्य ई-अभ्यासक्रमाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समजण्यास सोपे आणि कृतियुक्त शिक्षण मिळत असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी क्रीडा, विज्ञान, कला, सांस्कृतिक उपक्रम, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम, विज्ञान प्रयोग, शैक्षणिक सहली, स्पर्धा व कार्यशाळा नियमितपणे आयोजित केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता व नवोपक्रमाची वृत्ती विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, क्रीडा साहित्य, सुरक्षित व स्वच्छ शालेय परिसर, संगणक शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत आहे. “गुढी पाडवा प्रवेश वाढवा” अभियानाच्या माध्यमातून शिक्षकांनी परिसरातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून पालकांना मनपा शाळांमधील सुविधा, उपक्रम व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची माहिती देण्यास दि. १ मार्च पासून सुरुवात केली आहे. तसेच शाळाबाह्य व गळती विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

महापालिकेच्या या मोहिमेचा विस्तार संपूर्ण नाशिक शहरात दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने गोदाघाट, चिंचबन, मखमलाबाद, निमाणी, मार्केट यार्ड, संजय नगर, एरंडवाडी, तारावाला नगर झोपडपट्टी, देवळालीगाव, विहितगाव, सिन्नर फाटा, गोरेवाडी, चाडेगाव, पाथर्डी, प्रशांत नगर, वडाला, नागझरी, दुधबाजार, भारत नगर, टाकली, समता नगर, अंबड, दत्तनगर, कामटवाडे, कामगार नगर, सातपूर, आनंदवली, गंगापूर, आडगाव, म्हसरूळ, नांदूर, वडाला गाव, पंचक, दसक, उपनगर यांसारख्या सर्व प्रमुख भागांचा समावेश आहे.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाने “प्रत्येक मुलगा-मुलगी शाळेत” हा संकल्प समोर ठेवून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अभियानाची प्रभावी सुरुवात केली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जवळच्या मनपा शाळेत करून घ्यावा आणि गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे