आरोग्य व शिक्षण

शिक्षणसंस्था-कॉर्पोरेट जगत एकत्र आल्यास स्टार्टअप क्रांती. केटीएचएम महाविद्यालयातील संशोधन कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर.

*शिक्षणसंस्था-कॉर्पोरेट जगत एकत्र आल्यास स्टार्टअप क्रांती.

*केटीएचएम महाविद्यालयातील संशोधन कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर*

——————-

*नाशिक :* देशभरातील शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट जगताने एकत्र येऊन काम केल्यास देशात मोठी स्टार्टअप क्रांती घडू शकते, असा सूर मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात आयोजित तीन दिवशीय कार्यशाळेत उपस्थित विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उमटला.

मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालय व आयसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अध्यापनशास्त्र व संशोधन’ या विषयावर तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.के.एम. आहिरे होत्या. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.आहिरे यांनी संशोधनाचे रुपांतर उद्योगामध्ये आवश्यक असणारे गुण आणि उद्योजकीय क्षमता यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध iRiSE आयसर पुणेच्या डॉ. तेजस बोरवणकर, डॉ. मानवा दिवेकर-जोशी, डॉ. मिलिंद चौधरी व वैष्णवी कुलकर्णी होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. बोरस्ते आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. एस. के. बिन्नोर मान्यवर म्हणून उपस्थित होते. समन्वयक डॉ. आर. बी. आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संशोधकामध्ये शिक्षण क्षेत्रातील बदल, उद्योजकता आणि संशोधनवृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे सांगत संशोधक विद्यार्थ्यांना नवीन आणि अभिनव कल्पनांच्या आधारे स्वतःचे स्टार्ट-अप उभारण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.

एका विशेष चर्चासत्रात ‘संशोधन, आधुनिक अध्यापनशास्त्र आणि उद्योजकता’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तेजस बोरवणकर यांनी ‘कंपनी आणि संशोधन’ यांच्यातील संबंध वाढवण्यावर भर दिला. त्या म्हणाल्या की, ‘कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर जेव्हा प्रयोगशाळेत संशोधन होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रगती साधली जाते. उद्योगांच्या गरजा ओळखून संशोधकांनी आपली दिशा ठरवणे गरजेचे आहे.’

शिक्षण क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना डॉ. मानवा दिवेकर-जोशी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि त्यातील अध्यापनशास्त्रावर (Pedagogy) प्रकाश टाकला. नवीन शैक्षणिक पद्धतीत केवळ पाठांतर न ठेवता, विद्यार्थ्यांनी संकल्पना कशा आत्मसात कराव्यात आणि शिक्षकांनी शिकवण्याच्या कोणत्या आधुनिक पद्धती वापराव्यात, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. मिलिंद चौधरी आणि श्रीमती वैष्णवी कुलकर्णी यांनी संशोधनाचे यशस्वी उद्योगात रूपांतर कसे करावे, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना आणि तरुण संशोधकांना गुरुकिल्ली दिली. कच्च्या कल्पनेपासून ते बाजारपेठेतील उत्पादनापर्यंतचा प्रवास त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केला. आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, संशोधन आणि उद्योग जगतातील अंतर कमी करणे आवश्यक आहे, असे मत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

डॉ. सचिन गुरुळे यांनी पीएच.डी. कोर्सवर्कमधील या कार्यशाळेचे महत्व सांगितले. डॉ.आर.बी.आंधळे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. उपप्राचार्य डॉ. एन. डी. गायकवाड, डॉ मिलिंद चौधरी व वैष्णवी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरण व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.नितीन बोरसे आणि डॉ. सचिन गुरुळे यांनी परिश्रम घेतले. प्रा.नितीन बोरसे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यशाळेला विज्ञान शाखेतील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

————————

*नाशिक : मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालय व आयसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अध्यापनशास्त्र व संशोधन’ या विषयावर तीन दिवशीय कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे. व्यासपीठावर मान्यवर.*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे