सिन्नरच्या ब्राह्मणवाड्यात बालविवाह थांबवला.

प्रतिनिधी |नाशिक जन्मत भारत सरकारने मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असे कायद्या अंतर्गत विवाह साठी बंधन घातले आहे परंतु त्याचे उल्लंघन काहीजण करत असल्याचे समोर आलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील
ब्राह्मणवाडे आणि मोह येथे शनिवारी (दि. १४) होऊ घातलेले दोन बालविवाह सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून रोखले. पोलिस आणि गावच्या पोलिस पाटलांच्या तत्परतेमुळे दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह थांबविण्यात यश आले.
दोन्ही गावांत अल्पवयीन मुलींच्या विवाहाची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित गावांच्या पोलिस पाटलांनी तातडीने याबाबत कळविल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी पथकासह घटनास्थळी पोहचून
विवाह सोहळे थांबविले. दोन्ही कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली. अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची समज पालकांना देण्यात आली. पुढील काळात बालविवाह करणार नाही, अशी लेखी हमी संबंधितांकडून घेण्यात आली असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष टेमगर, नितीन काकड, प्रशांत वाघ, ग्रामसेवक गोरख सोनवणे आणि सरपंच विलास गीते यांच्या सहकार्याने करण्यात आली.
सरकारतर्फे इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असून देखील नागरिकांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.
अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहे.


