मातंग समाजातील बेरोजगारांनी* *थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा*
दिनांक: 26 नोव्हेंबर, 2022
*मातंग समाजातील बेरोजगारांनी*
*थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा*
*नाशिक, दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 (जि.मा.का. वृत्तसेवा):*
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालयामार्फत मातंग व त्याअंतर्गत येणाऱ्या 12 पोटजातीतील बेरोजगारांसाठी थेट कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर, 2022 या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे यांनी केले आहे.
थेट कर्ज योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात 50 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट असून त्यामध्ये 50 टक्के शहरी व 50 टक्के ग्रामीण तसेच 50 टक्के पुरुष व 50 टक्के महिला लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी कर्ज प्रकरण तीन प्रतीत आवश्यक कागदपत्रांसह महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत.
या कर्ज योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रुपये 1 लाख कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी 4 टक्के व्याजदर व तीन वर्षांत 36 हफ्त्यामध्ये परतफेड, अर्जदाराचा सहभाग व अनुदान रकमेचा यात समावेश असणार आहे. बेरोजगार इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधावा.