नोंदणीकृत असंघटीत कामगारांनी अपघाती विमा योजना लाभासाठी* *ऑनलाईन दावे दाखल करावेत* *:विकास माळी.
*नोंदणीकृत असंघटीत कामगारांनी अपघाती विमा योजना लाभासाठी*
*ऑनलाईन दावे दाखल करावेत*
*:विकास माळी*
*नाशिक, दिनांक: 27 डिसेंबर, 2023 नाशिक जनमत. वृत्तसेवा):*
असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या दृष्टीने त्यांचा डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आला असून 26 ऑगस्ट 2021 पासून असंघटीत कामगारांची ई-श्रम पोर्टल वर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून ते 31 मार्च 2022 पर्यंत नोंदणीकृत असंघटीत कामगारांनी अपघाती विमा योजनेच्या लाभासाठी दावे दाखल करावेत, असे आवाहन कामगार उप आयुक्त, नाशिक विभाग विकास माळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ऑनलाईन दावे निकाली काढण्यासाठी केंद्र शासनातर्फे मार्गदर्शक तत्वे व कार्यप्रणाली जारी करण्यात आली असून ऑनलाईन एक्स-ग्रेशिया मॉड्यूल कार्यान्वित करण्यात येणार आहे. या मॉड्यूलच्या सुरळीत कामकाजासाठी केंद्र शासनामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असून अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सदस्य सचिव तर सहाय्यक कामागार आयुक्त सदस्य आहेत.
*योजनेचे निकष*
▪️असंघटीत कामगार आयकर भरणारा नसावा
▪️असंघटीत कामगार भविष्य निर्वाह निधी व राज्य कर्मचारी विमा भरणारा नसावा.
▪️असंघटीत कामगार 31 मार्च 2022 पूर्वी नोंदीत असवा
▪️असंघटीत कामागाराचा अपघात/ घटना 31 मार्च 2022 पूर्वी झालेली असावी.
*असे आहेत अपघाती विमा योजनेंतर्गत देय लाभ*
▪️अपघाती मृत्यूसाठी रूपये 2 लाख.
▪️दोन डोळे कामयस्वरूपी निकाली, दोन हात व दोन पाय कायमस्वरूपी निकामी, एक हात व एक पाय कायमस्वरूपी निकामी, एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय कायमस्वरूपी निकामी असल्यास रूपये 2 लाख.
▪️एक डोळा कायमस्वरूपी निकामी, एक हात किंवा एक पाय कायमस्वरूपी निकामी असल्यास रूपये 1 लाख.
जिल्ह्यातील असंघटीत कामगारांचा अपघाती विमा योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी, तपासणी, पडताळणी करून अर्ज मंजुरी करण्याकरिता जिल्हाधिकारी नाशिक यांनी 21 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशान्वये कामगार उप आयुक्त, नाशिक विभाग यांना प्रदान करण्यात आले आहेत. असंघटीत कामगाराचा मृत्यू झालेला असल्यास किंवा कायमस्वरूपी अंपगत्व आले असल्यास संबंधित कामगार अथवा त्यांचे वारसदार यांनी विहित नमुन्यात (परिशिष्ठ-1) अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामगार उप आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक कार्यालय, गाळा क्रमांक 18 व 19, 4 था मजला, उद्योग भवन, आयटीआय सिग्नल सातपूर यांच्याकडे सादर करावे, असेही कामगार उप आयुक्त विकास माळी यांनी कळविले आहे.