मविप्र ची मॅरेथॉन स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक ठरणार. एडवोकेट नितीन ठाकरे
*यंदाची ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’ रेकॉर्ड ब्रेक ठरणार : ॲड. नितीन ठाकरे*
*नाशिकमध्ये रविवारी रंगणार ९ वी राष्ट्रीय व १४ वी राज्यस्तरीय स्पर्धा*
*हॉकी खेळाडू ऑलिम्पिकपटू रेणुका यादव यांची प्रमुख उपस्थिती*
*नाशिक :* ‘रन फॉर हेल्थ ॲण्ड बिल्ड द नेशन’ हे ब्रीद वाक्य घेऊन गेल्या १३ वर्षांपासून राज्यस्तरावर तर आठ वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’ या स्पर्धेला देशभरातील खेळाडूंकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता यंदा ही स्पर्धा ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरणार आहे, असा विश्वास मविप्रचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला. रविवार दि. १२ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५’ या स्पर्धेसंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी मविप्रचे शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक प्रा. डॉ. एस. के. शिंदे, प्रा. सी. डी. शिंदे, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके, प्रा. डॉ. के.एस. शिंदे, प्रा. डी. डी. जाधव, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी, प्रा. हेमंत पाटील यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख, सदस्य आणि क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
यावेळी ॲड. ठाकरे यांनी सांगितले कि, ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५’ च्या शुभारंभाची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यंदाची मविप्र मॅरेथॉन ही ९ वी राष्ट्रीय व १४ वी राज्यस्तरीय स्पर्धा असून, रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौक येथून स्पर्धा सुरू होईल. गंगापूर रोडमार्गे धोंडेगावपर्यंत आणि तिथून पुन्हा मॅरेथॉन चौक येथे समारोप असा स्पर्धेचा मार्ग असेल. प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू ऑलिम्पिकपटू रेणुका यादव, राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती असेल.
‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’ ही स्पर्धा सामाजिक एकता, तंदुरुस्ती आणि सामुदायिक भावनेला प्रोत्साहन देणारी आहे. संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्ष सन २०१४ पासून ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर होत आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मविप्र मॅरेथॉन’ हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. मविप्र मॅरेथॉन स्पर्धेपासून सुरुवात केलेले तसेच क्रीडा क्षेत्रात पदार्पण केलेले अनेक खेळाडू आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान यश संपादन करीत आहेत. त्यात सर्वेश कुशारे, वैभव शिंदे, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, सुरेश वाघ, दुर्गा देवरे, शरयू पाटील, मंगेश जगताप, चैताली बोडके, मंजित मेहतो, गौरव लांबे, सागर नागरे, कस्तुरी चौघुले, दत्ता बोरसे, निकिता संभेराव, सागर गाढवे, निलेश धोंडगे, सुलतान देशमुख, शुभम भंडारी, वेदांत ताजणे, विदीत गुजराथी अशा अनेक खेळाडूंचा समावेश असल्याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले.
देश पातळीवर होणाऱ्या नामवंत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश झालेला आहे. राष्ट्रीय स्तरावर आयोजित होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजनासाठी सिद्ध होत आहे. गेल्या १३ वर्षांतील स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय व नामवंत खेळाडू प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असून, त्यामध्ये धनराज पिल्ले, महाराष्ट्र केसरी काका पवार, लालचंद राजपूत, पी. टी. उषा, कविता राऊत, सुशिलकुमार, नरसिंग यादव, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, गगन नारंग, अंजू बॉबी जॉर्ज, दत्तू भोकनळ, ललिता बाबर, अजित लाक्रा, मीर रंजन नेगी यासारख्या नामवंत खेळाडूंचा समावेश असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी ॲड. ठाकरे यांच्या हस्ते ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन ट्रॉफी’सह वेगवेगळ्या टी शर्टस् चे अनावरण करण्यात आले.
*विजेत्यांना यंदा साडे आठ लाखांची बक्षीसे*
या स्पर्धेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. पाच हजार रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत अशी एकूण साडे आठ लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. फूल मॅरेथॉन (४२.१९५ किमी) साठी एकूण ११ विजेत्यांना अनुक्रमे एक लाख ५१ हजारांपासून ते ११ हजारांपर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. हाफ मॅरेथॉन (२१.०९७ किमी)साठी एकूण ९ विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजारांपासून ते ३ हजारांपर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिला व पुरुष १० किमी खुल्या गटातील स्पर्धेसाठी प्रत्येकी ९ अशा १८ स्पर्धकांना ११ हजारांपासून ते १ हजारापर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. १४, १७, १९ आणि २५ वर्षांआतील मुले आणि मुलींच्या खुल्या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटात सहा स्पर्धक निवडण्यात येणार असून, यामध्ये पाच हजारांपासून ते एक हजारापर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी ॲड. ठाकरे यांनी दिली.
*‘फन रन’चे आकर्षण*
यंदाच्या स्पर्धेत वेगवेगळ्या थिमवर आधारित ‘फन रन’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरण रक्षण, बेटी बचाव-बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा, झाडे लावा-झाडे जगवा, महिला सक्षमीकरण, निरोगी आरोग्य, योग, जागर शिक्षणाचा या सामाजिक विषयांचा समावेश आहे, असल्याचेही ॲड. ठाकरे यांनी सांगितले.
*स्पर्धेची वैशिष्ट्ये : ‘आरएफ आयडी टॅग’ या डिजिटल प्रणालीचा वापर*
या स्पर्धेसाठी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन तसेच नाशिक जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशन यांची अधिकृत मान्यता आहे. या वर्षीपासून सर्व धावपटूंना त्यांच्या धावण्याच्या क्रमांकामध्येच (बिब नंबर) ‘आरएफ आयडी टॅग’ लावण्यात येणार आहे. यामुळे अंतिम रेषा पार केल्यानंतर स्पर्धकाला त्याने स्पर्धा किती वेळेत पूर्ण केली याची अचूक माहिती काही सेकंदातच मोबाइलवर मिळेल. स्पर्धेत पारदर्शकता रहावी, यासाठी यंदापासून स्पर्धेत डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले.
*आदर्श क्रीडा पत्रकार पुरस्कार जाहीर*
संस्थेच्या वतीने मविप्र मॅरेथॉननिमित्त गेल्या सहा वर्षांपासून आदर्श क्रीडा पत्रकार पुरस्कार प्रदान केला जातो. नाशिक जिल्ह्यातील दै. सकाळ या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या उत्कृष्ट लिखाणाद्वारे शिक्षण व क्रीडा क्षेत्राची सेवा करणारे पत्रकार अरुण मलानी यांना यंदाचा आदर्श क्रीडा पत्रकार पुरस्कार याप्रसंगी जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी २०२५ रोजी मविप्र मॅरेथॉनच्या बक्षीस वितरणादरम्यान होणार आहे, अशी माहिती सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली.
*देशातील एकमेव मॅरेथॉन स्पर्धा*
निवास व भोजनाची व्यवस्था असणारी भारतातील एकमेव मॅरेथॉन स्पर्धा असल्याने संपूर्ण देशातील धावपटू जानेवारी महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतात. या स्पर्धेचा धावणमार्ग अतिशय सुलभ व सहजगत्या लक्षात राहण्याचा असल्याकारणाने तसेच नाशिकचे आल्हाददायक वातावरण असल्यामुळे दिवसेंदिवस या स्पर्धेचा दर्जा उंचावत असल्याचे आयोजन समितीने सांगितले.
*विजेतेपदासाठी सेनादलाच्या जवानांमध्ये चुरस*
यंदाच्या स्पर्धेत फूल मॅरेथॉनसाठी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, हरयाणा या राज्यांतील खेळाडूंनीही सहभाग नोंदवला आहे. तसेच भारतीय सेनादलातील लेफ्टनंट कर्नल नारायण तसेच गुरजित सिंग, हेमंत सिंग, उदेश कुमार, अनिल जिंदाल, अविनाश पटेल या सारख्या नामवंत खेळाडूंनीही फूल मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे.
*वैद्यकीय यंत्रणा सज्ज*
मविप्र संचलित डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या ६ अॅम्बूलन्स, भारत विकास ग्रुप, अपोलो हॉस्पिटल, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, रेडक्रॉस यांच्याकडून प्रत्येकी १ अशा एकूण १० अॅम्बूलन्स व तज्ज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक स्पर्धेप्रसंगी खेळाडूंसमवेत स्पर्धा मार्गावर तैनात असेल. आवश्यक प्रथमोपचारासाठी ४० बेडचे हॉस्पिटल सज्ज करण्यात आलेली आहे.
*बक्षीस वितरण समारंभ*
मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रेणुका यादव, राज्याचे कृषिमंत्री मा. ना. ॲड. श्री. माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. श्री. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडेल. विजयी खेळाडूंना रोख पारितोषिके व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
*अशी आहे नोंदणीप्रक्रिया*
मविप्र मॅरेथॉनसाठीची नोंदणीप्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी दोन्ही प्रकारात ठेवण्यात आली आहे. त्यासाठी क्यू आर कोड आणि ऑनलाइन लिंक तयार करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी https://www.nashikmvpmarathon.org/marathon/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
*सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व पदक*
मविप्र मॅरेथॉनमध्ये ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक टी शर्ट दिला जाणार असून, फलाहार, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व पदक, तर विजेत्याला ट्रॉफी, रोख स्वरूपातील बक्षीस, प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित केले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
*स्पर्धेचा मार्ग असा…*
या स्पर्धेसाठी वर्ल्ड अॅथलेटीक्सच्या मॅरेथॉन आणि रोड रेसेसच्या तांत्रिक नियमांनुसार स्पर्धेचे अंतर कॅलिब्रेटेड बायसिकलचा वापर करून निश्चित करावे लागते. त्यानुसार स्पर्धा संयोजन समितीने रोडचे अंतर मापन केले आहे. संपूर्ण मविप्र मॅरेथॉन गंगापूर रोड या मार्गावर घेण्यात येणार असून, स्पर्धेची सुरुवात मविप्र मॅरेथॉन चौकापासून होणार आहे. पुढे गंगापूर रोडमार्गे जुना गंगापूर नाका, विद्या विकास सर्कल, आनंदवली, सोमेश्वर, हॉटेल गंमत जंमत, दुगाव फाटा, गिरणारे, धोंडेगाव व परत मविप्र मॅरेथॉन चौक येथे स्पर्धा पूर्ण होणार आहे.
*स्पंजिंग पॉइंट, रिफ्रेशमेंटची व्यवस्था*
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन नियमाप्रमाणे ४२.१९५ कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेसाठी हिराबाग, हॉटेल गंमत-जंमत, भारत पेट्रोल पंप, सप्तशृंगी मंदिर धोंडेगाव, गिरणारे, गंगापूर डॅम गेट, गंगापूर बस स्टॅन्ड, श्री स्वामी समर्थ चौक असे ८ रिफ्रेशमेंट पॉइंट आहेत. तसेच, पाटील फार्म-गंगापूर गाव, फ्रावशी आंतरराष्ट्रीय स्कूल, ओझरखेड फाटा, धोंडेगाव टेकडी, पटेल टेकडी फार्म, केळकर फार्म, उषाताई बेंडकुळे फार्म अशा ७ स्पंजिंग पॉइंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धकांसाठी इलेक्ट्रॉल पावडर, मिनरल वॉटर, लिंबू पाणी, ऑरेंज ज्यूस, संत्री, मीठ पाणी अशा रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आली आहे.
*सांस्कृतिक कार्यक्रम असे…*
स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांसाठी तसेच कमी अंतरावरील स्पर्धकांना स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी संस्थेतील शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले देशभक्तीपर तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
*गतवर्षीचा विजेता : अक्षय कुमार*
गेल्या वर्षी दि. २८ जानेवारी २०२४ रोजी पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत १४ गटांतील एकूण लहान मोठ्या ३ हजार धावपटूंनी सहभाग नोंदविला होता. सर्वात लहान वयोगट १४ वर्षे आतील मुलींकरिता ३ किलोमीटर अंतर होते तर खुल्या गटासाठी ४२.१९५ किलोमीटर अंतर होते. ४२.१९५ किलोमीटर अंतराची फुल मॅरेथॉन स्पर्धा उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमारने २ तास २६ मिनिटे व १ सेकंदात जिंकून एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच मविप्र क्राऊनचे पारितोषिक पटकावले होते. २१.०९७ किलोमीटर अंतराची हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्तर प्रदेशच्याच रिंकू सिंग याने १ तास ६ मिनिटे ३५ सेकंदात जिंकून विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेचा विक्रम हरियाणाच्या करणसिंग याच्या नावावर असून, त्याने २०१८ मध्ये ४२.१९५ किलोमीटर अंतराची स्पर्धा २ तास २२ मिनिटे ३९ सेकंदात जिंकली होती. या स्पर्धेसाठी मुख्य अतिथी म्हणून चक दे इंडिया फेम आंतरराष्ट्रीय हॉकीपटू व मार्गदर्शक मीर रंजन नेगी उपस्थित होते.
*निवास व भोजनव्यवस्था*
सहभागी खेळाडूंपैकी मुलांच्या निवासाची व्यवस्था संस्थेच्या वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर येथे तर मुलींची निवास व्यवस्था अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड येथे तसेच खुल्या पुरुष गटातील खेळाडूंची व्यवस्था केटीएचएम महाविद्यालय, होरायझन स्कूल येथे करण्यात आलेली आहे. धावपटू, संघ व्यवस्थापक व पंच यांच्याकरिता ११ जानेवारी रोजी रात्रीचे जेवण व १२ जानेवारी रोजी स्पर्धा संपल्यानंतर भोजनव्यवस्था अभिनव बालविकास मंदिर येथे विनामूल्य करण्यात आली आहे.
*स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेतील विविध शाखांचा सहभाग*
स्पर्धा संयोजनाकरिता निवास, भोजन व बैठक व्यवस्था, वैद्यकीय पथक, तांत्रिक समिती, स्टेज, मंडप, तज्ज्ञ क्रीडा संचालकांची नियुक्ती तसेच स्वयंसेवक, पायलट व पंच समिती अशा विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी ५०० शिक्षकांची पंच, पायलट, तांत्रिक समिती, रिफ्रेशमेंट व स्पंजिंग समिती, सुरुवात पंच, अंतिम रेषा पंच, टर्निंग पॉइंट पंच, बक्षीस वितरण अशा विविध समित्यांमध्ये नेमणूक केलेली आहे. ७०० स्वयंसेवक स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी ध्वज दाखविणार आहेत. सदर स्पर्धा उत्कृष्ट व शास्रशुद्ध पद्धतीने होण्यासाठी नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी व कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य, संस्थेचे शिक्षणाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा संचालक व क्रीडाशिक्षक, आयोजन समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत.