आदिवासी विकास विभागाची पदभरती तूर्त स्थगित*
*आदिवासी विकास विभागाची पदभरती तूर्त स्थगित*
*नाशिक, दिनांक 12 जून, 2024 (जिमाका वृत्तसेवा):* आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावर 23 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागातील 602 विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु शासन निर्देशानुसार काही अपरिहार्य कारणामुळे सदर पदभरती जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याचे आयुक्त आदिवासी विभाग, नाशिक नयना गुंडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावरून या पदभरती जाहिरातीनुसार 23 नोव्हेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. विविध पदांकरिता उमेदवारांचे अर्जही ऑनलाईन प्राप्त झाले होते. तथापि 26 फेब्रुवारी 2024 रोजीच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) या संवर्गाचा समावेश करून त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट क संवर्गासाठी जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आले आहे.
सदर जाहिरात तूर्तास स्थगित करण्यात आली असून, याची नोंद उमेदवारांनी घेण्याचे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. तसेच, याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येणार असल्याची अर्ज भरलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.