देश-विदेश

नाशिकच्या उन्नतीसाठी “उन्नत नाशिक अभियान” लोगोचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते २५ एप्रिल रोजी अनावरण;

गटनेते व पर्यावरणप्रेमींची बैठक संपन्न

  • नाशिकच्या उन्नतीसाठी “उन्नत नाशिक अभियान” लोगोचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते २५ एप्रिल रोजी अनावरण; गटनेते व पर्यावरणप्रेमींची बैठक संपन्न

नाशिक महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या “उन्नत नाशिक अभियान” (स्वच्छ नाशिक | सुंदर नाशिक | हरित नाशिक) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अनुषंगाने, मोहिमेच्या लोगोचे अनावरण हा कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी या अभियानाच्या लोगोचे भव्य अनावरण करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत मा. महापौर सौ. हिमगौरी आडके व मा. स्थायी समिती सभापती श्री. मच्छिंद्र सानप, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच सर्व गटनेते व पर्यावरणप्रेमी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी भाजप गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, शिवसेना (उ.बा.ठा.) गटनेते केशव पोरजे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नामदार गिरीश महाजन यांचे ओएसडी संदीप जाधव , डॉ. आवेश पलोड (घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक), नगरसचिव आदींसह समाजसेवी शेखर गायकवाड व मनोज साठे उपस्थित होते.

 

 

“उन्नत नाशिक अभियान” हे दिनांक २२ एप्रिल २०२६ (वसुंधरा दिन) ते २२ एप्रिल २०३० या कालावधीत राबविण्यात येणार असून, शहराचा सर्वांगीण, शाश्वत व नागरिक-केंद्रित विकास साधणे हा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत रेनवॉटर हार्वेस्टिंग, सार्वजनिक उद्याने व ठिकाणांचे सुशोभीकरण, बांधकाम स्थळ व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, Garbage Vulnerable Points (GVP) निर्मूलन, १००% स्त्रोतावर कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त क्षेत्र निर्मिती, हरित क्षेत्र वाढ व नागरिक सहभाग वृद्धीकरण यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

अभियानातील “भूप्रहरी” ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण असून, शहराच्या स्वच्छता, सौंदर्यीकरण व हरितीकरणासाठी स्वयंसेवक म्हणून कार्य करणारी ही मुख्य कार्यकारी शक्ती ठरणार आहे. विविध सामाजिक घटकांमधून सामाजिक जाणीव व पर्यावरणप्रेम असलेल्या नागरिकांची भूप्रहरी म्हणून निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील १० भूप्रहरी सदस्यांची नावे (संपर्क तपशीलांसह) नगरसचिव कार्यालयाकडे दिनांक २८ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भूप्रहरींसाठी दिनांक १ मे २०२६ रोजी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे अभियानाचे संकल्पक कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा म्हणून आयोजित करण्यात आले असून,

नाशिक महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “उन्नत नाशिक अभियान” यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. इच्छुक समाजसेवी नागरिकांसाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नाशिक महानगरपालिकेमार्फत सर्व उपस्थित पक्षांचे गटनेते यांनी नागरिक, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले असून “उन्नत नाशिक अभियान” यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे