ब्रेकिंग

अन्न व औषध प्रशासनाच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलला नागरिकांचा प्रतिसाद;*एकूण १२४ ऑनलाईन तक्रारींची नोंद*

 

 

*अन्न व औषध प्रशासनाच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलला नागरिकांचा प्रतिसाद;*एकूण १२४ ऑनलाईन तक्रारींची नोंद*

 

*नाशिक, दि. 28 जुलै नाशिक जनमत  (जिमाका वृत्तसेवा) :* नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे तसेच अन्न भेसळ, अस्वच्छता, मुदतबाह्य व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या ऑनलाइन तक्रार पोर्टलला नाशिक विभागातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. 15 जुलै 2026 रोजी कार्यान्वित झालेल्या पोर्टलवर १२४ ऑनलाइन तक्रारींची नोंद झाली असून, त्यापैकी बहुसंख्य तक्रारींची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. नागरिकांनी अन्न सुरक्षेसंदर्भात पुढाकार घेऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यात अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून नागरिकांना अन्नाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रारी सहजपणे नोंदविता याव्यात यासाठी ‘एकएफडीए’ ऑनलाइन तक्रार पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे नागरिक घरबसल्या तक्रार नोंदवू शकतात तसेच त्या तक्रारीवर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली याची माहितीही ऑनलाइन पाहू शकतात.

 

नाशिक विभागात अस्वच्छ उत्पादन, साठवणूक (हॉटेल परिसर) १६, अन्नपदार्थांमध्ये बाह्य घटक आढळल्याबाबत १२, निकृष्ट दर्जाचे पॅकेज्ड अन्न-लेबलिंगमधील त्रुटी २८, मुदतबाह्य अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत १३, चुकीचे अथवा दिशाभूल करणारे लेबलबाबत २, दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीबाबत १३, खाद्यतेल व तुपातील भेसळीबाबत ३, हॉटेल्समध्ये निकृष्ट किंवा कमी दर्जाचे अन्न दिल्याबाबत १०, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आदी पदार्थांच्या विक्रीबाबत १२ तर इतर स्वरूपाच्या १५ अशा एकूण १२४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 

नागरिकांना complaints.mahafda.in या ऑनलाइन पोर्टलवर ॲपद्वारे तक्रार नोंदविता येते. तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक नमुने घेतात व तपासणी करतात. तपासणीनंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीची संपूर्ण माहिती तक्रारदाराला पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे तक्रार नोंदविण्यापासून ते तिच्या अंतिम निपटाऱ्यापर्यंतची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली आहे.

 

यापूर्वी नागरिकांनी दूरध्वनी किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन तक्रारी केल्यानंतर त्यावर काय कार्यवाही झाली, याची माहिती मिळविणे कठीण होते. मात्र, नव्या ऑनलाइन व्यवस्थेमुळे तक्रारींचा निपटारा अधिक वेगाने होत असून तक्रारदाराला प्रत्येक टप्प्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध होत आहे. यामुळे प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास वाढण्यास मदत होत आहे.

 

नागरिकांना ऑनलाइन तक्रार नोंदविताना अडचण आल्यास १८००२२३३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसायाविषयी अथवा भेसळयुक्त, निकृष्ट किंवा अस्वच्छ अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांनी निर्भयपणे तक्रार नोंदवावी. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत नियम व विनियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अन्न व औषध प्रशासन, नाशिकचे सहाय्यक आयुक्त (अन्न) ज्ञा.सु.महाले यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे