मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसचे गिफ्ट; PM-eBus योजनेअंतर्गत नाशिक सिटी लिंक व JBM Ecolife Mobility यांच्यात १० वर्षांचा करार.

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसचे गिफ्ट; PM-eBus योजनेअंतर्गत नाशिक सिटी लिंक व JBM Ecolife Mobility यांच्यात १० वर्षांचा करार*
📍नाशिक जनमत चंद्रकांत धात्रक यांच्याकडून
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने आज महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महायुतीचे नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त PM-eBus सेवा योजनेअंतर्गत नाशिक सिटी लिंक आणि JBM Ecolife Mobility Private Limited यांच्यामध्ये १० वर्षांच्या कालावधीसाठी ५० अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस पुरविण्याबाबत करारनामा (Contract Agreement) करण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या करारनाम्यावर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे नाशिककरांना सुरक्षित, आरामदायी, आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक आणि पर्यटकांसाठी वाहतूक व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.
या करारानुसार JBM Ecolife Mobility Private Limited कंपनीकडून बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती (Maintenance), तांत्रिक सेवा तसेच आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या PM-eBus सेवा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामुळे (Subsidy) नाशिक महानगरपालिकेवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
इलेक्ट्रिक बसच्या वापरामुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन इंधन दरवाढीचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर कमी होईल. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनात घट होऊन शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासही मोठी मदत होणार आहे. स्वच्छ, हरित आणि शाश्वत नाशिक घडविण्याच्या दिशेने हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नाशिकच्या वाढत्या गरजा, आगामी कुंभमेळ्याचे नियोजन आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा करार ऐतिहासिक व दूरदृष्टीचा निर्णय असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे नाशिक शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि भविष्योन्मुख होण्यास निश्चितच मदत होईल.
यावेळी उपमहापौर श्री. विलास अण्णा शिंदे, स्थायी समिती सभापती श्री. मच्छिंद्र भाऊ सानप, भाजपा गटनेते श्री. श्याम भाऊ बडोदे, शिवसेना गटनेते श्री. अजय जी बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेच्या सौ. सीमा रंजन ठाकरे, शिवसेना (उबाठा) गटनेते केशव तात्या पोरजे, सिटी लिंक महाव्यवस्थापक श्री. विजयकुमार मुंडे, व्यवस्थापक श्री. राहुल तोरो, JBM कंपनीतर्फे श्री. प्रदीप उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.



