नाशिक रोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात रक्तपेढी व नवजात शिशु कक्षाचे लोकार्पण.

नाशिक रोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात रक्तपेढी व नवजात शिशु कक्षाचे लोकार्पण
नाशिक | जनमत नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नाशिक रोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक रक्तपेढी (Blood Bank) व नवजात शिशु कक्ष (Newborn Care Unit) यांचे उद्घाटन आज नाशिक महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. हिमगौरी ताई आहेर-आडके व आमदार मा. राहुलभाऊ ढिकले यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तपेढी व नवजात शिशु कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. या नवीन सुविधांमुळे नाशिक शहरासह परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, तातडीची व सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून विशेषतः अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण, गर्भवती माता तसेच नवजात बालकांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महापौर मा. हिमगौरी ताई आहेर-आडके यांनी यावेळी सांगितले की, नाशिक महानगरपालिका नागरिकांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. रक्तपेढी सुरू झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल, तर नवजात शिशु कक्षामुळे नवजात बालकांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार तात्काळ उपलब्ध होतील. शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका विविध सुविधा विकसित करत राहील, असे त्यांनी नमूद केले.
आमदार मा. राहुलभाऊ ढिकले यांनी या उपक्रमाबद्दल नाशिक महानगरपालिकेचे व सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभिनंदन करत नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आधुनिक वैद्यकीय सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असून या उपक्रमामुळे आरोग्य सेवेची गुणवत्ता निश्चितच उंचावेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.



