ब्रेकिंग

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी ताई आहेर-आडके यांचा गोदाकाठी पाहणी दौरा; महानगरपालिका यंत्रणा अलर्ट मोडवर

 

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी ताई आहेर-आडके यांचा गोदाकाठी पाहणी दौरा; महानगरपालिका यंत्रणा अलर्ट मोडवर

📍नाशिक,जनमत   दि. २३ जुलै २०२६
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी ताई आहेर-आडके यांनी तातडीने आपत्कालीन यंत्रणांचा आढावा घेत विविध पूरग्रस्त व संवेदनशील भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने काम करण्याचे निर्देश दिले.

महापौरांनी अहिल्यादेवी होळकर पुल परिसराला भेट देऊन गोदावरी नदीच्या वाढत्या पाणीपातळीची पाहणी केली. संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता गोदाकाठावरील सर्व संवेदनशील भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल, वैद्यकीय पथके तसेच संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

 

यावेळी महापौरांनी नाशिक महानगरपालिकेच्या कमांड कंट्रोल सेंटर (Emergency Control Room) येथे भेट देऊन आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेतला. नियंत्रण कक्षामध्ये आतापर्यंत ७० हून अधिक नागरिकांचे आपत्कालीन कॉल प्राप्त झाले असून प्रत्येक तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. प्राप्त होणारे कॉल तत्काळ संबंधित विभागांकडे पाठवले जात असून सरासरी १५ मिनिटांच्या प्रतिसाद कालावधीत (Response Time) आवश्यक मदत पुरविण्यात येत आहे. सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून संपूर्ण महानगरपालिका यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

 

सध्याचा हवामानाचा अंदाज आणि सतत सुरू असलेला पाऊस लक्षात घेता शहरात महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस कायम राहिल्यास गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाहूनगर, मिलिंद नगर, काजीकडी, आठवडे बाजार आणि गौरी पटांगण परिसरातील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच शहरातील जुने व जीर्ण झालेले वाडे आणि धोकादायक इमारती परिसरात विशेष आपत्कालीन व्यवस्था तैनात करण्यात आली असून संबंधित विभागांना सातत्याने देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

पूर परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास प्रभावी प्रतिसाद देता यावा यासाठी राज्य शासनाकडे अतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन मनुष्यबळाची मागणी करण्यात आली असून ते मनुष्यबळ लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

रामकुंड परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू असल्यामुळे तसेच नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नागरिकांनी त्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, पर्यटन किंवा छायाचित्रणासाठी जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही महापौरांनी केले.

दरम्यान, गंगापूर धरण ७५ टक्क्यांहून अधिक भरलेले असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळाला असून, या आठवड्यातील नियोजित पाणी कपात रद्द करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

महापौर सौ. हिमगौरी ताई आहेर-आडके यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा तसेच प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी SDM(प्रांत अधिकारी) अर्पिता ठुबे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे