अचानक पावसानंतर प्रशासनाची युद्धपातळीवर कामे; पाणी निचरा, चेंबर स्वच्छता आणि रस्ते सुरळीत करण्यावर भर

अचानक पावसानंतर प्रशासनाची युद्धपातळीवर कामे; पाणी निचरा, चेंबर स्वच्छता आणि रस्ते सुरळीत करण्यावर भर
नाशिक : जनमत शहरात मंगळवारी झालेल्या अचानक व जोरदार पावसानंतर काही भागांमध्ये पाणी साचणे, चिखल निर्माण होणे तसेच सुरू असलेल्या रस्ते व युटिलिटी कामांच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने मैदानात उतरून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या.
महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय पथके कार्यरत करण्यात आली असून शहरातील विविध भागांमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनेज चेंबर उघडणे, गाळ व कचरा काढणे, पाण्याचा निचरा सुरळीत करणे, आवश्यकतेनुसार पंपांच्या साहाय्याने पाणी उपसणे, रस्त्यांवरील अडथळे दूर करणे तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
याचबरोबर महापालिकेमार्फत विभागनिहाय पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला जात असून, पावसामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तसेच नाशिकच्या दीर्घकालीन आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते, पर्जन्यजल वाहिन्या, पाणीपुरवठा, ड्रेनेज, गॅस पाइपलाइन आणि ऑप्टिकल फायबर केबल यांसारखी पायाभूत सुविधा विकासकामे सुरू आहेत. 
दरम्यान, कामांमध्ये अनावश्यक विलंब, दर्जाबाबत त्रुटी अथवा सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार दंडात वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
” अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. विकासकामे ही शहराच्या दीर्घकालीन हितासाठी असून गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे पालन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.



