नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि १० जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पदसिद्ध अध्यक्ष नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या विशेष उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान पॅव्हेलियन हॉल, त्रंबक रोड, नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली.
सचिव समीर रकटे यांच्या प्रास्ताविकाने सभेला सुरुवात झाली. त्यांनी मागील सभेचे इतिवृत व २०२५-२६ चे वार्षिक अहवाल वाचन केले. २०२५-२६ चा खर्च व २०२६-२७ च्या अंदाज पत्रकाला सभेने एकमताने मंजूरी दिली. सभेपुढील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वागत करण्यात आले. चेअरमन विनोद शहा यांनी एन डी सी ए च्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच विविध सभासदांच्या सूचना व शंकांना त्यांचे समाधान होईपर्यंत सविस्तर उत्तरे दिली.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे माननीय जिल्हाधिकारी यांनी आभार मानून आपल्या मार्गदर्शनपर भाषणाला सुरुवात केली.
यावेळी त्यांनी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ही महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्रिकेट संघटनांपैकी एक असून, खेळाडू घडविणे, क्रिकेटचा प्रसार करणे तसेच विविध वयोगटांतील स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात संघटनेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी त्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे क्रिकेट मैदानावर अत्याधुनिक फ्लड लाईट्स उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यामुळे राष्ट्रीय व राज्यस्तरीय सामने, महिला क्रिकेट स्पर्धा तसेच सायंकाळी सराव सत्रे अधिक प्रभावीपणे आयोजित करता येतील, असे त्यांनी सांगितले.
तसेच, खेळाडूंना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने दीर्घकालीन आर्थिक नियोजन करून आवश्यक निधीची तरतूद करावी, असेही त्यांनी सुचविले. भविष्यात तालुका स्तरावर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रे, दर्जेदार क्रिकेट मैदाने आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
माननीय जिल्हाधिकारी यांचे अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन
माननीय जिल्हाधिकारी यांनी सुमारे एक तास केलेले मार्गदर्शन अत्यंत अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि विचारप्रवर्तक होते. आपल्या संबोधनामध्ये त्यांनी संस्कृती आणि क्रीडा यांची सांगड घालून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या दोन्ही क्षेत्रांचे महत्त्व अत्यंत समर्पकपणे विशद केले.
क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे प्रभावी माध्यम आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. आपल्या प्रशासकीय अनुभवातून त्यांनी क्रीडा संघटनांनी पारदर्शकता, दूरदृष्टी आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा अवलंब करून खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे मार्गदर्शन केले.
संपूर्ण भाषणात अभ्यासपूर्ण मांडणीबरोबरच प्रसंगी विनोदी शैलीचा सुरेख वापर करून त्यांनी उपस्थित सभासदांचे लक्ष शेवटपर्यंत खिळवून ठेवले. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहिले आणि संदेशही प्रभावीपणे पोहोचला.
आपल्या पदाची जबाबदारी, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि क्रीडा विकासाबाबतची तळमळ यांचे प्रत्यंतर त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होते. त्यांच्या या प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने उपस्थित सर्व सभासदांना नवी ऊर्जा, सकारात्मक दिशा आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली.
या वार्षिक सभेला एन डी सी ए चे पदाधिकारी व आजीव सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचेअरमन विनोद शहा, खजिनदार हेमंत देशपांडे , सह-सचिव श्री योगेश ( मुन्ना ) हिरे , श्री चंद्रशेखर दंदणे व सेक्रेटरी समीर रकटे 



