नाशिकचा अभिमान : कु. गौरी मुरकुटे यांचे एमपीएससी कृषी सेवा परीक्षेत घवघवीत यश

नाशिकचा अभिमान : कु. गौरी मुरकुटे यांचे एमपीएससी कृषी सेवा परीक्षेत घवघवीत यश
नाशिक : जनमत नाशिक जिल्ह्याची कन्या कु. गौरी भाऊसाहेब मुरकुटे (रा. मातोरी) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात १३ वा क्रमांक मिळवला असून डेप्युटी डायरेक्टर (कृषी) या पदासाठी त्या पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.
कु. गौरी मुरकुटे यांनी २०२१ मध्ये के. के. वाघ महाविद्यालय येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०२३ मध्ये धुळे येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी सातत्याने अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. ग्रामीण पार्श्वभूमीतून येत असतानाही त्यांनी उच्च ध्येय ठेवून ते गाठले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नाशिक महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर सौ. हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर मा. श्री विलास शिंदे, शिवसेना उबाठा गटनेता नगरसेवक केशव पोरजे, श्री निवृत्ती इंगोले, नगरसेवक श्री कैलास आण्णा मुदलियार आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी कु. गौरी यांच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, “नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन एवढे मोठे यश मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. कु. गौरी यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
उपमहापौर विलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अशा यशस्वी युवा-युवतीमुळे नाशिकची ओळख अधिक बळकट होत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देत मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कु. गौरी मुरकुटे यांचे वडील श्री भाऊसाहेब एकनाथ मुरकुटे हे शेतकरी असून, त्यांच्या कष्टाचे आणि मुलीच्या जिद्दीचे आज खऱ्या अर्थाने सोने झाले आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या गौरी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवून दाखवले आहे, ही बाब समाजासाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी कु. गौरी मुरकुटे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शकांना देत, “सतत प्रयत्न करत राहिल्यास कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते,” असा संदेश उपस्थितांना दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य नियोजन आणि सातत्य राखण्याचा सल्लाही दिला.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कु. गौरी मुरकुटे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांच्या या यशामुळे नाशिकचा नावलौकिक राज्यभर पसरला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



