आरोग्य व शिक्षण

दि. १ मार्च पासून “१००% प्रवेशासाठी मनपा शिक्षण विभागाचे पटनोंदणी अभियान सुरू.

 

दि. १ मार्च पासून “१००% प्रवेशासाठी मनपा शिक्षण विभागाचे पटनोंदणी अभियान सुरू.

 

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, शाळाबाह्य व गळती विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे तसेच “१००% प्रवेश” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दि. १ मार्च २०२६ पासून “पटनोंदणी अभियान” सुरू करण्यात आले आहे. हे अभियान दि. २५ मार्च २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शहरातील विविध केंद्रांअंतर्गत येणाऱ्या मनपा शाळांमध्ये मोठ्या उत्साहात जनजागृती व पटनोंदणी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या त्या परिसरातील केंद्रप्रमुख व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांना विशेष जबाबदारी देण्यात आली असून अभियानाचे नियोजन, जनजागृती उपक्रम व पटनोंदणीची संपूर्ण कार्यवाही त्यांच्या समन्वयातून करण्यात येत आहे. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने परिसरनिहाय नियोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

अभियानादरम्यान प्रभात फेरी, घोषणा मोहीम, घरभेटी, पालक सभा, विद्यार्थ्यामधील कला गुणांचे सादरीकरण यांसारखे उपक्रम राबवून पालकांना आपल्या मुलांना मनपा शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच शाळांमधील स्मार्ट स्कूल, सुसज्ज संगणक लॅब, स्मार्ट बोर्ड, शासनमान्य ई-अभ्यासक्रमावर आधारित कृतीयुक्त शिक्षण, हाऊसेस व क्लब उपक्रम, मानसिक आरोग्य कार्यक्रम, पोलिस काका-दिदी उपक्रम, आनंददायी शनिवार, शैक्षणिक क्षेत्रभेटी (तारांगण, ट्रॅफिक पार्क, मनपा प्रकल्प), प्रकल्प जिज्ञासा, टिंकरिंग लॅब, वाचन उपक्रम, स्पेलिंग बी स्पर्धा, इस्रो सहल, डिमार्टचे ग्रंथालय व संगणक लॅब, याशिवाय ५ वी, ८ वी व NMMS शिष्यवृत्ती परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षण, क्रीडा महोत्सव व दिव्यांग क्रीडा उत्सव, मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येतात. मनपा शाळांचे “मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेतील यश, तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, सुरक्षित व सुसज्ज शाळा इमारत, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षा रक्षक, शैक्षणिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत पालकांना सविस्तर माहिती दिली जात आहे.

या अभियानांतर्गत गोदा घाट, चिंचबन, मधुबन कॉलनी, मखमलाबाद गाव, हरीभाई चाळ, निमाणी परिसर, मार्केट यार्ड, क्षीरसागर चाळ, संजय नगर, एरंडवाडी, भक्ति धाम परिसर, हुंडीवाला लेन, फुलेनगर, तारावाला नगर झोपडपट्टी, मायको दवाखाना परिसर, देवळालीगाव, विहितगाव, सिन्नर फाटा, गोरेवाडी, चाडेगाव, रेल्वे स्टेशन परिसर, राजवाडा, चेहडी, वडनेर दुमाला, पाथर्डी गाव, प्रशांत नगर, वाडीचेरान परिसर, वडाला, मुलतानीपुरा, नागझरी, झारेकरी कोट, दुध बाजार, स्वारबाबा, भारत नगर, अमरधाम परिसर, अंबड, चुंचाळे, दत्तनगर, कामटवाडे, घरकुल, कामगार नगर, पाईपलाईन रोड, शिवाजीनगर, राधाकृष्ण नगर, ध्रुव नगर, श्रमिकनगर, विश्वासनगर, पिंपळगाव बहुला, रायगड चौक, तोरणा नगर, पवननगर, सातपूर कॉलनी, महादेववाडी, स्वारबाबा नगर, भाजी मार्केट सातपूर परिसर, आयटीआय सिग्नल ते राजवाडा परिसर, आनंदवली, संतकबीर नगर, गंगापूर गाव, गणेश चौक, मोरवाडी झोपडपट्टी परिसर, राणा प्रताप चौक, अमृतधाम, बिडी कामगार कॉलनी, निलगिरी बाग, आडगाव, म्हसरूळ, बोरगड, नांदूर, मानूर, गंगा गोदाघाट परिसर, गणेशवाडी, पवार मळा, जेतवन नगर झोपडपट्टी, नेहरू नगर, मुक्तिधाम परिसर, वडाला गाव, घरकुल योजना, पंचक, दसक, जेल टाकी, उपनगर परिसर, इंगळे नगर, भगवा चौक व इंदिरा गांधी झोपडपट्टी अशा अनेक भागांमध्ये शिक्षकांकडून गृहभेटी व जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात येत आहे.

मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी नाशिक शहरातील मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मुलांचा प्रवेश करून पटनोंदणी अभियानाला सहकार्य करावे. तसेच मनपा शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासोबतच डिजिटल सुविधा, क्रीडा, संस्कार व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम उपलब्ध असल्याने पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

याशिवाय “एक शिक्षक – दहा विद्यार्थी” दत्तक योजना, विद्यार्थी राजदूत उपक्रम तसेच नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे मा.पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थित स्वागत असे प्रेरणादायी उपक्रमही राबविण्यात येत आहेत. १००% प्रवेश साध्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा शिक्षण विभागामार्फत गौरव करण्यात येणार आहे.

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे