ब्रेकिंग

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नासिक यांच्या वतीने गोदा जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाविषयी पत्रकार परिषद.

 

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नासिक यांच्या वतीने गोदा जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य राष्ट्रजीवन सन्मान व आध्यात्मिक समरसता महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासंदर्भात सविस्तर व अधिकृत माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते

 

गोदावरी ही केवळ एक नदी नसून ती भारतीय संस्कृतीची जीवनवाहिनी, अध्यात्माची प्रेरणास्थळी, पर्यावरणीय संवेदनशीलतेचे प्रतीक आणि सामाजिक समरसतेचा अखंड प्रवाह आहे. हजारो वर्षांपासून भारतीय समाजजीवन घडविणाऱ्या या पवित्र नदीच्या तटावरून समाजाला एकात्मतेचा, बंधुत्वाचा व सांस्कृतिक मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचा संदेश देणे, हाच या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

 

“जातिपाती विरल्या, मने समरस झाली, समाजशक्ती एकवटली, गोदाभक्ती उजळली” या मूलविचारावर आधारित हा महोत्सव समाजातील भेद विसरून सर्व घटकांना एका सूत्रात बांधणारा असून, राष्ट्रीय जीवनात अध्यात्म, संस्कृती आणि समरसतेचे महत्व अधोरेखित करणारा आहे.

 

या महोत्सवात पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्त्वाला समर्पित जीवनकार्य करणारे, भारतीय शेती, माती आणि शाश्वत विकास यासाठी आयुष्य वाहिलेले थोर कृषी तज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांना गोदा राष्ट्रजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य व पर्यटन मंत्री श्रीमान गजेंद्रसिंह शेखावत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून, हा क्षण नासिकच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

या कार्यक्रमाला वंदनीय शांताकुमारी (प्रमुख संचालिका – राष्ट्र सेविका समिती) यांचे मार्गदर्शन लाभणार असून, मा. सौ. विजया ताई रहाटकर (अध्यक्षा – राष्ट्रीय महिला आयोग) यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. तसेच पूज्य गौरांग प्रभुजी (प्रमुख मार्गदर्शक – इस्कॉन) यांचे आध्यात्मिक आशीर्वाद या महोत्सवाला लाभणार आहेत.

 

या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून ११११ महिलांची भव्य गोदा महाआरती आयोजित करण्यात येत आहे. या महाआरतीत परिचारिका, डॉक्टर, वैद्य, अभियंता, पोलीस खात्यातील महिला, महिला वकील, कामगार वर्गातील महिला वनवासी क्षेत्रातील युवती यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मातृशक्तीचा सहभाग असणार आहे. तसेच विविध जाती, संस्था, संघटना व सामाजिक घटकांतील महिलांचा सहभाग हे या महाआरतीचे वैशिष्ट्य असून, समरसतेचे जिवंत चित्र या माध्यमातून समाजासमोर उभे राहणार आहे.

 

ही गोदा महाआरती नासिक शहरातील आजवरची अत्यंत भव्य,व्यापक आणि सर्वसमावेशक महिला सहभाग असलेली आरती ठरणार असून, नासिक शहराच्या सर्व भागांतून मोठ्या संख्येने महिला या पवित्र उपक्रमात सहभागी होतील, असा समितीचा संकल्प आहे. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, नासिक शहरातील विविध भागांमध्ये महिलांसाठी गोदा महाआरतीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण वर्ग केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित नसून, त्यातून शिस्त, संस्कार, सामूहिकता आणि सांस्कृतिक जाणिवेचे संस्कार घडवले जात आहेत.

 

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव आध्यात्म, राष्ट्रजीवन,पर्यावरण आणि सामाजिक समरसता यांचा सुंदर संगम ठरणार असून, नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात एक नवा, प्रेरणादायी अध्याय जोडणारा ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

 

पत्रकार परिषदेस

जयंत गायधनी अध्यक्ष ,भक्तीचरन दास महाराज उपाध्यक्ष, नरसिंहकृपा प्रभु,मुकुंद खोचे सचिव,धनंजय बेळे,शैलेश देवी,चिराग पाटील, दीपक भगत,डॉ.अंजली वेखंडे,आशिमा केला, शिवाजी बोंदारडे, वैभव क्षेमकल्यानी, नरेंद्र कुलकर्णी,कल्पेश लोया,आशुतोष केला,विनीत पिंगळे,चैतन्य गायधनी,अक्षय शेरताटे, राजेंद्र फड उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे