भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये ‘लाल झेंडा मार्च’ उत्साहात संपन्न
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये ‘लाल झेंडा मार्च’ उत्साहात संपन्न
नाशिक :जन्मत
त
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ( CPI) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात शताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाकपा नाशिक जिल्हा व शहर समितीच्या वतीने नाशिक शहरात भव्य ‘लाल झेंडा मार्च’ काढण्यात आला. या मार्चद्वारे पक्षाचा गौरवशाली इतिहास आणि आगामी संघर्षाचा निर्धार ठामपणे मांडण्यात आला.
या रॅलीची सुरुवात नाशिकमधील ऐतिहासिक ईदगाह मैदान (गोल्फ क्लब) येथून झाली. प्रारंभी पक्षाच्या लाल ध्वजाचे ध्वजवंदन करण्यात आले. हे ध्वजवंदन कॉम्रेड देविदास भोपळे, महिला फेडरेशन व बांधकाम कामगार संघटनेच्या कॉम्रेड सौजन्या गोतपागर आणि विद्यार्थी संघटनेचे कॉम्रेड कैवल्य चंद्रात्रे यांच्या हस्ते संयुक्तपणे पार पडले.
मार्चदरम्यान “मार्क्सवाद जिंदाबाद”, “लाल बावटा जिंदाबाद”, “शेतकरी–कामगार एकजूट जिंदाबाद”, “फॅसिझम मुर्दाबाद”, “जातीवाद–मनुवाद मुर्दाबाद”, “समाजवाद जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. लाल झेंडे, महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन शेतकरी, कामगार, महिला आणि युवक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली शालिमार, मेहेर चौक मार्गे भारतीय कम्युनिस्ट पक्ष–आयटक कार्यालयापर्यंत पोहोचली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड मनोहर पगारे यांनी केले. त्यांनी पक्षाच्या शंभर वर्षांच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा घेतला.
यावेळी भाकपा राज्य सहसचिव कॉम्रेड राजू देसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात कम्युनिस्ट पक्षाचे मोलाचे योगदान आहे. आज लोकशाही व संविधान धोक्यात आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, कामगार कायद्यांमध्ये बदल करून शोषण वाढवले जात आहे, महिला कामगारांना किमान वेतन मिळत नाही, रोजगार हमी कायदा कमकुवत केला जात आहे. बेरोजगारी वाढली असून शिक्षण महाग झाले आहे. धर्माच्या नावावर राजकारण, पक्षफोड आणि पैशाच्या जोरावर लोकशाहीचा गैरवापर होत आहे. या सर्वांविरोधात संघटित लढा उभारून समाजवादासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.”

प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या शंभर वर्षांत शोषित, कष्टकरी वर्गासाठी रस्त्यावरील संघर्षापासून संसदेत आवाज उठवण्यापर्यंत सातत्याने भूमिका बजावली आहे. वाढत्या कॉर्पोरेट भांडवलशाही आणि फॅसिझमच्या विरोधात लढा देण्याच्या ऐतिहासिक जबाबदारीतून हा ‘लाल झेंडा मार्च’ आयोजित करण्यात आला. कॉ. राजू देसले, कॉ. मनोहर पगारे जिल्हा सचिव, कॉ. तल्हा शेख नाशिक सचिव, कॉ. प्राजक्ता कापडणे, कॉ. भीमा पाटील, मीना आढाव आदींच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. जिल्हा सचिव कॉम्रेड मनोहर पगारे यांनी प्रास्ताविक केले.
या रॅलीचे सूत्रसंचालन कॉम्रेड भीमा पाटील यांनी केले. आभार प्राजक्ता कापडणे यांनी केले. नाशिक उप महापौर गुलाम शेख यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला भाकपाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड भास्कर शिंदे, जिल्हा सहसचिव देविदास भोपळे, शहर सचिव तल्हा शेख, प्राजक्ता कापडणे, तसेच कॉम्रेड सुनीता कुलकर्णी, विराज देवांग,नामदेव बोराडे, दत्ता तुपे, मीना आढाव, राजू नाईक,, रमेश पवार, व्ही. डी. धनवटे, किरण डावखर, अमोल लोणारी, पद्माकर इंगळे,अनिल पठारे, योगेश जाधव, मीनाक्षी डोंगरे, राकेश वालझाडे , व्हि डि धनवटे, प्रणव कठवडे, आदींसह मोठ्या संख्येने पक्ष सदस्य व विविध जनसंघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या घोषणांनी आणि सहभागाने नाशिक शहरात कष्टकरी जनतेच्या हक्कांचा आणि समतेचा बुलंद आवाज उमटला.