दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप आडगावच्या देशमुख वस्तीवरील घटना.
दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप
आडगावच्या देशमुख वस्तीवरील घटना
नाशिक/ जनमत आडगाव : नाशिक शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचे दर्शन होऊ लागले आहे. दरम्यान वन विभागातर्फे सर्च ऑपरेशन झाले असले तरी बिबट्या वन विभागाला गेल्या पंधरा दिवसापासून मिळून आलेला नाही. कालच वाडीवर येथे एक मूत अवस्थेत बिबट्या मिळून आलेला आहे. जेजुरकर मळा इंडी पटेल रोड गायकवाड नगर मखमलाबाद शिवार इत्यादी परिसरामध्ये सध्या बिबट्याचे दर्शन होत आहे. दरम्यान काल बिबट्या या परिसरात असल्याचे कालच्या घटनेवरून दिसून येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
आडगावजवळच्या चारी क्रमांक-७जवळून दुचाकीवर जात असताना रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली. यावेळी दुचाकीस्वार ऋषिकेश भीमराव देशमुख (२१, रा. देशमुख वस्ती) थोडक्यात बचावला. ही घटना बुधवारी (दि. २४) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ऋषिकेश यास मध्यम स्वरूपाची दुखापत झाली आहे.
बिबट्याच्या पंजाच्या नखांनी त्याच्या अंगावरील कपडे फाटले व पाठीवर काही ठिकाणी किरकोळ, मध्यम स्वरूपाचे ओरखडे लागले. त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचे काका सुरेश देशमुख यांनी दाखल केले. प्रथमोपचार केल्यानंतर तासाभराने त्यास घरी सोडण्यात आले. ऋषिकेश हा मळ्यातून घराकडे कॅनॉलच्या रोडने दुचाकीने जात होता, यावेळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी तातडीने रात्रीच्या वनगस्ती पथकाला घटनास्थळी रवाना केले. पथकाने घटनास्थळ गाठून तेथील नागरिकांमध्ये जनजागृती करत घ्यावयाची दक्षता व उपाययोजनांबाबत माहिती दिली. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.