अश्विन नगर परिसरात वन्यप्राणी सांबर यशस्वीरित्या रेस्क्यू:*
*अश्विन नगर परिसरात वन्यप्राणी सांबर यशस्वीरित्या रेस्क्यू:*
*नाशिक जन्मत दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00* वाजेच्या सुमारास वन्यप्राणी सांबर नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात सैरावैरा पळत असल्याबाबत वनविभागाच्या रेस्क्यू हेल्पलाइनवर माहिती मिळाली. तात्काळ सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) नाशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक (प्रादेशिक), वनपाल नाशिक हे वन्यप्राणी बचाव पथक व रेस्क्यू नाशिक डिव्हिजन टीमसह घटनास्थळी दाखल झाले…
सदर वन्यप्राणी सांबर हे भरकटलेले होते व परिसरातील कुत्रे त्याचा पाठलाग करत होते त्यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याला कुंपणाची तार लागून गंभीर दुखापत झालेली दिसून आली. सदरचे सांबर हे मुंबई आग्रा महामार्ग लगत अश्विन नगर येथील सर्व्हिस रोडवर एका झाडाखाली बसलेले दिसून आले. अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी व नाशिक शहर पोलीस वाहतूक शाखा कर्मचारी यांचे मदतीने सर्व्हिस रोडवरील वाहतूक थांबवण्यात आली तसेच परिसर निर्मनुष्य करण्यात आला..
त्यानंतर रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे वन्यजीव पशुवैद्यक यांनी Tranquilization Gun च्या सहाय्याने बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. सुमारे पंधरा मिनिटांनंतर सांबर पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री करण्यात आली. सदर प्राण्यास ताब्यात घेऊन रेस्क्यू व्हॅनद्वारे पुढील उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र, म्हसरूळ येथे रवाना करण्यात आले.

सदर वन्यप्राणी सांबर सैरावैरा पळत असल्याने महामार्गावर दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती किंवा वन्य प्राण्याचा मृत्यू होऊ शकला असता. वनविभाग, नाशिक शहर पोलीस व रेस्क्यू नाशिक डिव्हिजन यांनी अतिशय चांगल्या समन्वयाने सुरक्षित रित्या वन्यप्राणी सांबर रेस्क्यू करण्यात यश मिळवले…

सदर वन्यप्राणी सांबर मादी असून अंदाजे वय 5 ते 6 वर्षे आहे. हे सांबर गौळाणे गावाचे मागील बाजूच्या जंगलातून आले असावे असा अंदाज आहे…सांबर सध्या सुस्थितीत असून त्याच्या डाव्या डोळ्यावर पुढील उपचार करण्यात येत आहे…

सदरचे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन श्री. सिद्धेश सावर्डेकर, उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली श्री.प्रशांत खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) नाशिक, श्री. सुमित निर्मळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक (प्रादेशिक) यांचे देखरेखीखाली वन्यप्राणी बचाव पथक व रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे अभिजीत महाले, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले व त्यांची टीम यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.
सदर कार्यवाहीमध्ये अंबड पोलीस स्टेशनचे श्री. जगवेंद्रसिंह राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.सचिन खैरनार, पोलीस निरीक्षक व त्यांची टीम तसेच नाशिक शहर वाहतूक पोलीस तसेच स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.