भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार* *जिल्हाधिकारी जलज शर्मा*
*भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार*
*जिल्हाधिकारी जलज शर्मा*
*त्र्यंबकेश्वर येथे संवादावेळी शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद*
*नाशिक*,जन्मत दि. २१ : आगामी कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनेच राबविण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसमवेत शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता (इगतपुरी- त्र्यंबकेश्वर), भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ, तहसिलदार श्वेता संचेती,
मुख्याधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने घाट व 30 मीटर रस्त्यांसाठी त्र्यंबकेश्वर हद्दीतील जमीन अधिग्रहण करण्याची आवश्यकता आहे, असे सांगत जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया, अन्य बाबींची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले. शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी शेतकऱ्यांना केले. या आवाहनाला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. भूसंपादन अधिकारी श्री. वाघ यांनी भूसंपादन करावयाच्य क्षेत्राची माहिती दिली. मुख्याधिकारी श्री. पाटील यांनी स्वागत केले.