पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा* *विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
*पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा*
*विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
*नाशिक, दिनांक: 29 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त):*
वसतिगृह योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येते. या योजनेचा धनगर समाजाच्या विद्यार्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक, देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
धनगर समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी नंतर महानगरपालिका क्षेत्र, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये तसेच मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण, व्यवसाय शिक्षण अभ्याक्रमासाठी महाविद्यालयात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे प्रवेश घेतला आहे. परंतु ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास, व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी आधार सलग्न बँक खात्यात थेट रक्कम वितरण केले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी धनगर समाजातील असावा अर्जासोबत विद्यार्थ्याने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थाच्या पालकाचे उत्पन्न रूपये 2.50 लाखांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी सलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे त्या शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
इतर अटी व शर्ती तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. असेही सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक श्री.नांदगावकर यांनी कळविले आहे.