त्र्यंबकरोडवरील अतिक्रमणांवरील कारवाईला जागा मालकांचा विरोध
नोटीसमागे घ्या अन्यथा आंदोलन.
प्रतिनिधी । नाशिक जन्मत
त्रंबकेश्वर रस्त्यावरील नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या नोटिसा आणि अतिक्रमण हटवण्याच्या हालचालींविरोधात जागा मालक शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आमचा विकासाला विरोध नसून केवळ प्रशासनाच्या सक्तीच्या कारवाईला व अन्यायकारक पद्धतीला विरोध आहे. यात तातडीने नोटीसा मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी (दि. १२) महिरावणी येथे याबाबतच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या जमिनी व जुनी घरे मोबदल्याशिवाय हटवणे अन्यायकारक असून त्याचा तीव्र विरोध केला जाईल. विकासाला विरोध नाही, मात्र प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने, कोणतीही चर्चा न करता. थेट कारवाई केल्यास शेतकऱ्यांना देशोधडीला लागावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेण्यात येईल. तसेच, त्यांनी एनएमआरडी कडून पाठवलेल्या
नोटिसा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांशी चर्चा न करता कोणतीही कारवाई करू नये, असा इशाराही दिला. या बैठकीला परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने आम्हाला विश्वासात घ्यावे, आमचा विकास हवाच आहे पण आमचा हक्क डावलून नव्हे, अशी भावना या प्रसंगी अॅड. प्रभाकर खराडे, उत्तमराव खांडबहाले, भाऊसाहेब खांडबहाले, संपत सकाळे, पुरुषोत्तम कडलग आदी शेतकरी उपस्थित होते.