रिक्षा व ट्रक मध्ये अपघात. एकाच कुटुंबातील तीन ठार.
![](https://nashikjanmat.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_20250121_172215_Chrome-780x470.jpg)
नाशिक जन्मत कल्यान : शहराच्या पूर्व भागातील नांदीवली येथे वास्तव्यास असणाऱ्या घुघे परिवाराचा सोमवारी दि.२० जानेवारी रोजी दुर्दैवी अपघात झाला. अमोल घुघे (वय २५) हे आपली पत्नी प्रतीक्षा घुघे (वय २२) व आपली मुलगी स्वरा घुघे (वय ४) यांच्या समवेत कल्याणहून आपल्या गावी जायला निघाले होते. त्यांनी नुकतीच नवीन रिक्षा घेतली होती व त्याच रिक्षाने ते गावी निघाले होते. याचदरम्यान नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर त्यांचा भीषण अपघात झाला.
नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार घुघे परिवार व त्यांच्या समवेत त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड (वय ६०), सासू कलावती आव्हाड (वय ५८) रिक्षाने प्रवास करीत होते. याचदरम्यान ओव्हरटेक करताना रिक्षाचालक अमोल यांना समोरून येणारा कंटेनर न दिसल्याने हा अपघात घडला. या अपघातात अमोल घुघे यांच्या सह त्यांची पत्नी प्रतीक्षा घुघे, मुलगी स्वरा व त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सासू कलावती आव्हाड या गंभीर जखमी असून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कंटेनर चालक राहुल कुमार प्रजापती (वय २८, झारखंड) हा सध्या वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या अपघाताचा सखोल तपास करीत आहेत. मात्र झालेल्या अपघातानंतर घुघे व आव्हाड या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमोल हे एका नामांकित वित्तसंस्थेत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होते. कुटुंबाच्या भवितव्यासाठी त्यांनी नुकतीच १ जानेवारीला नवी रिक्षा खरेदी केली होती व याच रिक्षाने ते प्रवास करीत होते. दुर्दैवाने याच रिक्षाने त्यांच्या कुटुंबाच्या जीवन प्रवासाचाही शेवट ठरला. या दुर्घटनेमुळे नातेवाईक, शेजारीपाजारी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.