दुध विक्रेत्यांनी उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहित* *दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी* *: अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे*
*दुध विक्रेत्यांनी उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहित*
*दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी*
*: अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे*
*नाशिक, दिनांक : 7 सप्टेंबर, 2023 वृत्तसेवा):*
जिल्ह्यातील दुध विक्रेत्यांनी उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहीत दुध व दुग्धजन्य पदार्थांचीच विक्री करावी. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पारधे यांनी केले आहे.
लहान मुलांच्या व ग्राहकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी सर्व दुध विक्रेते, स्वीटमार्ट धारक, किरकोळ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे यांनी दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतांना ते पदार्थ उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहीत व पदार्थांवर मुदतपूर्व दिनांक नमूद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल टेस्टिंग व्हॅनच्या माध्यमातून तपासणी करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच गुजरात राज्यातून येणारा खवा, मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.
पथकांमार्फत तपासणी करण्यात आलेले दुध व दुग्धजन्य पदार्थ कमी गुणप्रतीचे, भेसळयुक्त व मुदतपूर्व दिनांक नमूद नसल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापनेवर जिल्हास्तरीय समितीमार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ठरविण्यात आल्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.