राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त 16 मे रोजी* *विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन* *:वैशाली पाटील*
*राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त 16 मे रोजी*
*विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन*
*:वैशाली पाटील*
*नाशिक, दिनांक: 12 मे, 2022
जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवस म्हणून जिल्हाभरात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश जनेतेच्या सक्रिय सहभागासह डेंगी विषयी जनजागृती करणे हा आहे. यावर्षी डेंगी दिनासाठी Harness Partnership To Defeat Dengue अशी थीम देण्यात आली आहे. या मोहिमेत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, नागरिक यांनी सहभागी होवून डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला तर आपण डेंगी व चिकुनगुन्या आजारांना दूर ठेवु शकतो. यासाठी पाण्याची भांडी स्वच्छ करुन कोरडे करुनच त्यात पाणी भरणे योग्य असते. तसेच पाणी साठवुन ठेवतांना नेहमी पाणी साठवण्याची भांडी झाकून ठेवणे आवश्यक आहे. एडिस डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याचदा घरामध्ये, शहरात, गॅरेजमध्ये, कार्यालयात रोज न लागणाऱ्या वस्तु बाहेर उघड्यावर कचऱ्यात फेकल्या जातात किंवा छतावर ठेवल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पावसाचे पाणी साचते व आठवड्यानंतर डासांच्या अळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे निरुपयोगी सामानाची वेळीच विल्हेवाट लावणे अथवा ते झाकून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यात पावसाचे पाणी साचणार नाही. तसेच घराच्या छतावर पावसाचे पाणी साचून राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी असे जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी कळविले आहे.
*ही आहेत लक्षणे*
एडिस इजिप्टी डास चावल्यानंतर रुग्णात तापाची लक्षणे दिसायला लागतात. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, उलटी-मळमळ व अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसताच त्वरीत रक्ताची तपासणी करून घ्यावी. जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत तपासणी करण्यात येते. व डेंगीचे निदान झाल्यास वेळेत औषधोपचार करावा जेणेकरून डेंगीमुळे मृत्यू होण्याचे टाळता येवू शकते.
*असा ओळखावा डेंगीचा विषाणू*
डेंगी या विषाणुजन्य आजाराचा प्रसार एडिस इजिप्टी डासांच्या चाव्यामुळे होतो. एडिस डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. एडिस डासाला टायगर मॉस्किटो असेही म्हणतात कारण या डासाच्या अंगावर काळे-पांढरे चट्टे असतात व हा डास दिवसा चावतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहु शकतात. मात्र वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यातुन पुन्हा डासाची अळी तयार होत असतात. त्यामुळे डासांच्या अळ्या असलेली भांडी घासुन पुसून स्वच्छ केली पाहिजेत जेणेकरुन भांडयाच्या कडेला चिकटलेली अंडी निघुन जातील.
*अशी घ्यावी खबरदारी…*
डासांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छर दाणीचा वापर करणे, डास प्रतिबंधात्मक मलम वापरणे, खिडक्यांना बारीक जाळी बसवणे, अंग झाकुन राहील असे कपडे वापरणे असे उपायकरता येतील. गप्पी मासे हे डासांच्या अळ्या खातात त्यामुळे पाण्याचे मोठे हौद, विहीरी, डबके इत्यादी ठिकाणी गप्पी मासे टाकावेत ज्यामुळे तेथे डासांच्या अळ्या तयार होणार नाहीत.