हतगड येथे आदिवासी खाद्य मेळाव्याचे उद्घाटन.
दिनांक 12 मे 2022
*इट राईट मेळाव्याच्या माध्यमातून*
*आदिवासी खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोहचविणार*
*: संचालक प्रीती चौधरी*
*हतगड येथे आदिवासी खाद्य मेळाव्याचे उद्घाटन*
नाशिक दिनांक 12 मे 2022 (जिमाका वृत्तसेवा) :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इट राइट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आदिवासी खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोहचिण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाच्या संचालिका प्रीती चौधरी यांनी केले आहे.
आज सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी खाद्य मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती चौधरी बोलत होत्या. यावेळी कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वर्षा फडोळ, अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाचे उपसंचालक सुकांत चौधरी, सुरगाणा तहसीलदार सचिन मुळीक, गट विकास अधिकारी दीपक पाटील यांच्यासह आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे आदिवासी भागात विविध प्रकारचे अन्नधान्य, रानभाज्या उत्पादित केल्या जातात. यांच्यापासून बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले सकस व पौष्टिक खाद्य पदार्थांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांच्या खाद्य पदार्थांची माहिती जाणून घेण्यासाठी सर्वांनी या खाद्य मेळाव्याला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन कळवण प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालिका प्रीती चौधरी यांच्या हस्ते फीत कापून व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्लनाने खाद्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.