मविप्र संस्थेतर्फे आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता सर्वेश कुशारे यांचा सन्मान*
सर्वेशचे यश नव्या पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणादायी : ॲड. नितीन ठाकरे यांचे गौरवोद्गार*

*मविप्र संस्थेतर्फे आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता सर्वेश कुशारे यांचा सन्मान*
——————————————–
*सर्वेशचे यश नव्या पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणादायी : ॲड. नितीन ठाकरे यांचे गौरवोद्गार*
—-* नाशिक जनमत आशियाई क्रीडा स्पर्धेत उंच उडी क्रीडा प्रकारात २.२५ मीटरची उंची पार करत रौप्यपदकाची कमाई करणारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा माजी विद्यार्थी आणि भारताचा आंतरराष्ट्रीय उंच उडीपटू सर्वेश अनिल कुशारे याचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सर्वेशने आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून देशासह देवगावचे नाव उज्ज्वल केले असून, त्याच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे, असे मनोगत मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.
मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते देवगाव येथे सर्वेश कुशारे याच्या निवासस्थानी जाऊन त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्याचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचनाताई आणि पत्नी रोहिणीताई यांचाही गौरव करण्यात आला.
ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, सर्वेश कुशारे याने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. मविप्र संस्थेचा माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवतो, ही संस्थेसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. खेळाडूंच्या गुणवत्तेला योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर निश्चितच आपला ठसा उमटवू शकतात. सर्वेशचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी असून, त्याने आपल्या पुढील वाटचालीत ऑलिम्पिकमध्येही देशासाठी पदक मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करीत सर्वेश्ला शुभेच्छा दिल्या.
सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले कि, सर्वेशच्या यशामागे त्याची कठोर मेहनत, शिस्त, जिद्द आणि कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. खेळामध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण सरावाबरोबरच कुटुंबाचा पाठिंबा आणि समाजाचे प्रोत्साहन महत्त्वाचे असते. सर्वेशने मिळवलेले यश हे देवगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे. त्याच्या या यशातून नव्या पिढीतील खेळाडूंनी प्रेरणा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या सत्काराप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, तसेच गजीराम खुळे, अनिल बोचरे, नामदेव बोचरे, दत्तात्रय बोचरे, सचिन बोचरे, अरुण गावडे, दत्ता बोचरे, योगेश बोचरे, गणेश कोरडे, निवृत्ती खुळे, धनंजय जोशी, मनोहर बोचरे, बाबासाहेब चव्हाण, राजेंद्र पाटील, शेखर कुलथे, अरुण कुलथे, अक्षय उफाडे आणि संजय पाटील यांच्यासह मविप्र संस्थेचे सभासद व देवगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वेशच्या यशामागे त्याची स्वतःची मेहनत, कुटुंबीयांचे त्यागपूर्ण योगदान आणि त्याला मिळालेले प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या या खेळाडूचा सन्मान करून मविप्र संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आणि त्यांच्या यशाचा गौरव करण्याची आपली परंपरा अधोरेखित केली. सर्वेशने भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी पदक मिळवावे, अशा सदिच्छा यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या.
——————————–
*फोटो कॅप्शन*
*नाशिक : मविप्रचा माजी विद्यार्थी आणि भारताचा उंच उडीपटू सर्वेश अनिल कुशारे याचा सत्कार करताना मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि सभापती बाळासाहेब क्षीरसागर. समवेत सर्वेशचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचनाताई आणि पत्नी रोहिणीताई कुशारे आदी मान्यवर व ग्रामस्थ.*
——————————–



