जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी* *१७ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम* *योगेश पाटील, मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन*

*जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी*
*१७ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम*
*योगेश पाटील, मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन*
नाशिक जन्मत , दि. 1 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांच्यामार्फत १७ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या अर्जदारांची प्रकरणे अद्याप त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत, त्यांनी १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत त्रुटींच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून जमा करावीत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव योगेश पाटील यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीस प्राधान्य देण्यात येत आहे. समितीकडे त्रुटींच्या पूर्ततेअभावी अर्जदार स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान आवश्यक कागदपत्रांसह त्रुटींची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांच्या प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेऊन संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसंदर्भात अर्जदारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधू नये किंवा त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीच्या अधिकृत कार्यालयाशीच संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव श्री. पाटील यांनी केले आहे.




