चिमुकलीच्या एका इच्छेभोवती रंगणार ‘आली मोठी शहाणी’ची गोष्ट!

चिमुकलीच्या एका इच्छेभोवती रंगणार ‘आली मोठी शहाणी’ची गोष्ट!
‘ नाशिक जनमत मला मोठं व्हायचंय’ म्हणत गणपती बाप्पाकडे इच्छा व्यक्त करणाऱ्या एका चिमुकलीची गोष्ट ‘आली मोठी शहाणी’च्या टीझरमधून समोर आली होती. टीझरमधील या निरागस इच्छेने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ट्रेलरमध्ये या चिमुकलीच्या इच्छेभोवती रंगणारी मजेशीर गोष्ट आणि त्यातून निर्माण होणाऱ्या काही गंमतीदार प्रसंगांची झलक पाहायला मिळते. तिची ही इच्छा पुढे नेमकं काय रूप घेते, याचा अंदाज देत ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता कायम ठेवली आहे.
‘मोठं व्हायचं’ ही इच्छा मनात असलेल्या या चिमुकलीच्या कल्पनेभोवती चित्रपटाची गोष्ट फिरताना दिसते. या कथेत हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या व्यक्तिरेखाही महत्त्वाच्या ठरतात. हृता आणि सारंग पहिल्यांदाच एकत्र दिसत असल्याने त्यांच्या जोडीची उत्सुकता आधीपासूनच होती. ट्रेलरमध्ये हृता साकारत असलेल्या व्यक्तिरेखेची झलक लक्ष वेधून घेते, तर सारंगची व्यक्तिरेखा या कथेत नेमकी कोणती भूमिका बजावते, याचा अंदाज बांधण्याची संधी मिळते. या दोघांचा चिमुकलीच्या आयुष्याशी नेमका काय संबंध आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच समोर येणार आहे. त्यामुळे हृता-सारंगची जोडी आणि चिमुकलीच्या विश्वाची सांगड पडद्यावर कशी घातली आहे, हे पाहाणं रंजक ठरणार आहे.
या चित्रपटातील दोन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून त्यापैकी एक गणरायाच्या भक्तीत तल्लीन करणारी आणि उत्सवी वातावरणाला सुरेल रंग देणारी गणेश वंदना’ आहे. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले अभय जोधपूरकर यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला भक्तिरसाची अनुभूती मिळते. पंकज पडघण यांच्या संगीत रचनेतून गाण्याचा उत्सवी बाज खुलतो, तर गुरु ठाकूर यांच्या शब्दांमधून बाप्पाप्रतीची श्रद्धा आणि भक्तिभाव प्रभावीपणे व्यक्त होतो. तर स्वच्छंदी जगणं, मनमुराद आनंद आणि आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याची इच्छा… याच भावनांना सुरेल आणि देखणं रूप देणाऱ्या ‘फुलपाखरू’ या गाण्याचे सुंदर बोल गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे. या गाण्याला पंकज पडघण यांचे संगीत लाभले आहे. तर अपूर्वा निषाद यांनी हे गाणं आपल्या मनमोहक आवाजात गायलं असून उमेश जाधव यांचे नृत्यदिग्दर्शन लाभले आहे.
लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’ची कथा एका अतिशय साध्या इच्छेतून सुरू होते. मात्र त्या इच्छेभोवती गोष्ट जशी पुढे उलगडत जाते, तसतसे त्यातील वेगवेगळे पैलू समोर येतात. मुलांच्या मनात असणारे विचार आणि त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा यातून अनेक प्रसंग घडतात. या इच्छेभोवती नेमकी कोणती गोष्ट आकाराला येते, हे चित्रपटातून पाहायला मिळेल.”

निर्मात्या ईशा मुठे आणि श्रुती साठे म्हणतात, “कथेतील साधेपणा ही या चित्रपटाची खासियत आहे. या कथेत मुलांचं विश्व आहे, मात्र त्यातल्या अनेक गोष्टी मोठ्यांनाही आपल्याशा वाटतील. हृता आणि सारंगची जोडी या कथेला आणखी एक वेगळा पैलू देते. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.”

आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित ‘आली मोठी शहाणी’ची निर्मिती जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे यांनी केली आहे. फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क प्रस्तुत या चित्रपटात हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.



