मविप्र सेवकांना सातवा वेतन आयोग देणार.- वार्षिक सर्वसाधारण सभेत सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची घोषणा

*मविप्र सेवकांना सातवा वेतन आयोग देणार*
——————————–
*वार्षिक सर्वसाधारण सभेत सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची घोषणा*
——————————–
*नाशिक :* मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण घोषणा मविप्रच्या ११२ व्या सर्वसाधारण सभेत सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केली. संस्थेमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या सेवकांना १ जानेवारी २०२७ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाईल, असे सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी जाहीर केले. यासोबतच उर्वरित कर्मचाऱ्यांनाही योग्य पगारवाढ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्थेची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा हायस्कूलच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात पार पडली. या सभेत सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी संस्थेच्या १,२२९ कोटी ३० लाख रुपयांच्या विक्रमी अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले होते.
सभेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर अहवाल कालावधीत निधन झालेल्या संस्थेच्या दिवंगत सभासदांना व सेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दुखवटा प्रस्ताव मांडला, ज्यानुसार सर्व उपस्थितांनी मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केली. सभेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले, तर सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले.
मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मविप्र समाजाचा सन २०२५- २०२६ चा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे, सन २०२५- २०२६ चे मविप्र समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे व सर्व शाखांचे विभागवार एकत्रित खर्च-उत्पन्न पत्रके व ताळेबंद पत्रके यांना मंजुरी देणे, सन २०२६ – २०२७ साठी मविप्र समाजाचे मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांच्या एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन २०२६-२०२७ साठी हिशोब तपासणीसांची नेमणूक करणे, संस्थेच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडी-अडचणींचा विचार करणे तसेच मविप्र समाजाच्या विकासासाठी आर्थिक बाबींचा विचार करणे, मविप्र समाजाच्या ध्येयधोरणांनुसार पुढील कार्याची दिशा ठरविणे, मा. अध्यक्षसाहेब यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे, या सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यापैकी ‘संस्थेच्या मालकीचा स.नं.६९० ‘अ’ व ‘ब’मधील फायर ब्रिगेड स्टेशनकरिता आरक्षित असलेले ८ हजार चौ.मी. क्षेत्र मनपास हस्तांतर करणेस आलेल्या पत्राबाबत निर्णय घेणे’, हा विषय क्र. ८ प्रलंबित ठेवण्यात आला असून, कायदेशीर सल्ला आणि तज्ज्ञांचे मत घेऊन या विषयाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी जाहीर केले.
मविप्रचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, रमेश पिंगळे, ॲड. सयाजीराव गायकवाड यांनी विषयांचे वाचन केले. शिक्षणाधिकारी डी. डी. जाधव यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सभेस संस्थेचे संचालक शिवाजी गडाख, रवींद्र देवरे, कृष्णाजी भगत, प्रवीण जाधव, नंदकुमार बनकर, विजय पगार, डॉ. प्रसाद सोनवणे, अमित बोरसे, महिला सदस्य शोभा बोरस्ते, शालन सोनवणे, सेवक सदस्य प्रा. सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर यांच्यासह माजी सरचिटणीस निलिमा पवार, माजी अध्यक्ष तुषार शेवाळे, अरविंद कारे, माणिकराव बोरस्ते, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, नाना महाले, निवृत्त पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, भाऊसाहेब खताळे, पुंडलिक थेटे, नानासाहेब दाते, राजेंद्र मोगल, विजय गडाख आदींसह जिल्हाभरातील हजारो सभासद, हितचिंतक, मविप्र शिक्षणाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————-
प्रतिक्रिया
११२ वर्षांची परंपरा असलेल्या मविप्र संस्थेची आजची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. काही लोकांना सभेमध्ये गोंधळ होईल, असे वाटत होते, मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. सर्व विषय एकमताने मंजूर झाले. सर्वांना बोलण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांचे मी आभार मानतो. सर्व आजी-माजी पदाधिकारी, सभासद, सेवक, हितचिंतक यांचेही मी मनापासून आभार मानतो. यापुढेही सर्वांचे असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*- ॲड. नितीन ठाकरे,* सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक.
प्रतिक्रिया.
इतक्या मोठ्या संखेने सभासद असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते, सभासदांनी संयम आणि समंजसपणा दाखवत सभा शांततेत पार पाडली. सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी आपला अहवाल सभासदांपुढे मांडून त्यांचे समाधान केले. शांततेत पार पडलेल्या या सभेमुळे काही विघ्नसंतोषी लोकांना पोटशूळ उठला असेल.
– प्रा. हरिष आडके, ज्येष्ठ सभासद
——————————–
*ॲड. नितीन ठाकरे यांनी केले शंकांचे निरसन*
यावेळी सभा संपण्याच्या वेळी माजी सरचिटणीस निलिमा पवार यांनी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित सभासदांनी त्यांना बोलण्यास तीव्र नकार दिला. त्याचप्रमाणे प्रणव पवार यांनी सभागृहात काही प्रश्न उपस्थित केले. परंतु, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच, काही माजी संचालक बोलण्याचा प्रयत्न करीत असताना सभासदांनी त्यांना जोरदार विरोध केला.

*सभासदांनी गोंधळापेक्षा कामकाजाला दिले प्राधान्य*
सभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचे प्रयत्न झाले असले तरी सभासदांनी त्याला व्यापक प्रतिसाद न देता विषयांवर चर्चा करण्याला प्राधान्य दिले. परिणामी, आर्थिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय विषयांवरील कामकाज पुढे सरकले. मविप्रसारख्या व्यापक शैक्षणिक संस्थेत मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे. मात्र, मतभिन्नता आणि संस्थेच्या कामकाजात व्यत्यय यामध्ये स्पष्ट सीमारेषा असणे आवश्यक आहे. संस्थेच्या हितासाठी प्रश्न विचारणे, निर्णयांवर चर्चा करणे आणि आवश्यक तेथे विरोध नोंदविणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे; परंतु अंतिम उद्देश संस्थेची प्रगती हाच असला पाहिजे, असा संदेश या सभेच्या निमित्ताने पुढे आल
*विकासाच्या पंचसूत्रीसमोर गोंधळाचा प्रयत्न निष्प्रभ*
सभेत काही व्यक्तींनी कामकाजात व्यत्यय आणण्याचे प्रयत्न केले असले तरी सभासदांच्या संयमी आणि सकारात्मक भूमिकेमुळे संस्थेच्या विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी राहिला. गोंधळाच्या प्रयत्नांपेक्षा विकासाचा आवाज अधिक बुलंद ठरवत सभा नियमानुसार पूर्ण करण्यात सुजाण सभासदांनी मोलाचे सहकार्य केले. आर्थिक शिस्त, शैक्षणिक विस्तार, रोजगाराभिमुख शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास आणि पारदर्शक प्रशासन या विकासाच्या पंचसूत्रीवर संस्थेच्या पुढील वाटचालीची दिशा अधोरेखित झाली.

सरचिटणीस-अध्यक्ष यांच्या भूमिकेने सभा निर्विघ्न
मविप्रची ताकद तिच्या व्यापक सभासदवर्गात आणि शैक्षणिक कार्याच्या मोठ्या विस्तारात आहे. त्यामुळे कोणत्याही मतभेदाचे रूपांतर व्यक्तीगत संघर्षात न होता धोरणात्मक चर्चेत झाले, तर संस्थेच्या भविष्यासाठी ते अधिक उपयुक्त ठरेल. गोंधळ कितीही झाला तरी विकासाचा अजेंडा थांबविता येत नाही. संस्थेची आर्थिक क्षमता मजबूत करणे, शैक्षणिक विस्तार करणे, विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि प्रशासन अधिक पारदर्शक करणे या पंचसूत्रीवर वाटचाल झाली तर मविप्रची पुढील दिशा अधिक व्यापक होऊ शकते, हेच सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी आजच्या सभेतून दाखवून दिले. विशेष म्हणजे यंदाची सभा निर्विघ्न पार पाडण्यात सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची वकिली मात्रा आणि अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांचा डॉक्टरी डोस लागू पडल्याचे दिसून आले.
——————————-
*…अखेर सभा शांततेतच पार पडली*
मविप्रच्या आगामी निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा असल्याने ही सभा वादळी ठरण्याची चर्चा केवळ चर्चाच ठरली. कारण वार्षिक सभेमध्ये सभासदांनी शांततेत कामकाज सुरू ठेवण्याला दिलेले प्राधान्य आणि अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी वारंवार ‘आपल्याला सभा शांततेत पार पडायची आहे’ असा दिलेला संदेश हेच या सभेचे ठळक वैशिष्ट्य ठरले. अखेरीस गोंधळाचा आवाज मागे पडला आणि संस्थेच्या विकासाचा आवाज सभागृहात अधिक प्रभावी ठरला..हेच सभासदांनी समजूतदारपणे या सभेच्या निमित्ताने दाखवून दिले.
——————————-
*वर्षभरातील मविप्र संस्थेची कामगिरी*
*प्रमुख आकडेवारी*
शैक्षणिक शाखा: ५१४
एकूण विद्यार्थी: २,१२,८१६
एकूण सेवक: ११,५६५
आजीव सभासद (जनरल): १०,१९७
आजीव सभासद (सेवक): ४६३
*विद्यार्थीसंख्येतील वाढ*
राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन महाविद्यालय: २०२२-२३ मधील ३०० वरून २०२६-२७ मध्ये ९६० विद्यार्थी.
कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय (UG, PG व PhD): ५०८ वरून १,४०४ विद्यार्थी.
डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय (UG, PG व PhD): १९४ वरून २२४ विद्यार्थी.
इंग्रजी माध्यम शाळा: १३,२९० वरून २२,४२२ विद्यार्थी.
*प्रमुख उपक्रम व उल्लेखनीय कामगिरी*
चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे यशस्वी आयोजन.
रेडिओ कर्मवीर ८८.४ MHz कम्युनिटी स्टेशनची सुरुवात; Android व iOS App द्वारे जगभरात प्रक्षेपण.
मविप्र फिटनेस अकॅडमी आणि मविप्र माऊंटेनेरिंग क्लब सुरू.
मविप्र युवास्पंदन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन.
मराठा उद्योजक मेळावे: २,००० उद्योजकांचा सहभाग; ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक बिझनेस रेफरन्सेस.
मविप्र माजी विद्यार्थी संघ त्रिरश्मी फेलोशिप उपक्रम.
दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचे इमेट प्रशिक्षण व अद्ययावत रिसोर्स सेंटर.
बॉश टेक्निकल स्किल सेंटर सुरू.
मविप्र पत्रिकेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, कृषी, स्त्री-शक्ती, करिअर, विश्व मराठी संमेलन आणि रोजगार यांसारख्या विषयांवर विशेषांक.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेद्वारे गुडघा व खुबा सांधेरोपण तसेच किडनी व यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया.
मविप्र दिनदर्शिकेचे प्रकाशन.
उदाजी महाराज वसतिगृह आवारात शेतमाल बाजाराचे आयोजन.
सह्याद्री मित्र संमेलनाच्या आयोजनात पुढाकार.
IISER, IUCAA आणि MSFDA यांच्याशी रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार.
HRDC मार्फत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन.
कर्मवीर अॅड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेंटर कार्यरत.
सुमारे ६०० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार; मविप्र माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने विद्यार्थीहित, कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीचे विविध उपक्रम.
*रोजगारनिर्मिती*
२०२५-२६ मध्ये एकूण रोजगार मेळावे: १४
नोंदणीकृत विद्यार्थी: १३,३६०
नोकरीप्राप्त विद्यार्थी: ५,२०९
रोजगार मेळावे व महाविद्यालय स्तरावरील प्लेसमेंटमधून एकूण रोजगारनिर्मिती: ७,७१२
२०२१ मधील ५११ रोजगारांवरून २०२६ मध्ये ७,७१२ रोजगारनिर्मिती करण्यात आली.
*पायाभूत सुविधा : विविध शाखांसाठी इमारत बांधकाम*
ग्रामीण भाग: २१ कोटी ३५ लाख रुपये
शहरी भाग: ३० कोटी ३२ लाख रुपये
एकूण: ५१ कोटी ६७ लाख रुपये
*कर्जफेड व आर्थिक बाबी*
अहवालकाळात संस्थेने १ कोटी ४७ लाख ९९ हजार ९४३ रुपये कर्जफेड केली.
गेल्या चार वर्षांत एकूण ४७ कोटी ९८ लाख १४ हजार रुपये कर्जफेड करण्यात आली.
संस्थेवर सध्या १७ कोटी ७० लाख ९८ हजार रुपये कर्ज बाकी आहे.
*चार वर्षांत १०६ कोटी ११ लाख रुपयांची पगारवाढ*
संस्थेतील एकूण ११,५६५ सेवकांपैकी ८,२०८ सेवक विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत आहेत.

(सभेत वाद होतील म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता )
या सेवकांना महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलमधून विशेष सवलत मिळावी, यासाठी कार्यकारिणीकडून प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे.चाचडगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मविप्र समाज संस्थेस सवलत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे. विनाअनुदानित सेवकांच्या वेतनापोटी अहवालकाळात संस्थेने २४७ कोटी १८ लाख रुपये अदा केले. गेल्या चार वर्षांत १०६ कोटी ११ लाख रुपयांची पगारवाढ झाली आहे.



