ब्रेकिंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रामतीर्थ येथे सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याच्या व्यवस्थांचा घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रामतीर्थ येथे सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याच्या व्यवस्थांचा घेतला आढावा

 

नाशिक, दि. ३० ऑक्टोबर नाशिक जनमत वृत्तसेवा) :

 

गोदावरीच्या पवित्र तीरावर उद्या, शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचा मंगलमय शुभारंभ होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री रामतीर्थ परिसरास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

 

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते रामतीर्थ येथे विधिवत पूजन करण्यात आले. उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळाची सजावट, धार्मिक विधींचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन तसेच विविध प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तयारीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

 

सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा जागतिक परिचय करून देणारा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या महापर्वाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपतींची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून सोहळ्याच्या अनुषंगाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या दक्षतेने पार पाडाव्यात, अशा दृष्टीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तयारीचा आढावा घेतला.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पुरोहित संघाचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोदावरीच्या तीरावर उद्या ध्वजारोहणाने सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पर्वाचा औपचारिक प्रारंभ होणार असून, या सोहळ्याच्या माध्यमातून नाशिकच्या कुंभपरंपरेचा आध्यात्मिक वारसा आणि सांस्कृतिक वैभव पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे