मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर डी. आर. भोसले जयंती उत्साहात संपन्न
शिक्षण, सहकार व समाजसेवेच्या कार्यातून कर्मवीरांचे योगदान अधोरेखित*

*मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर डी. आर. भोसले जयंती उत्साहात संपन्न
*शिक्षण, सहकार व समाजसेवेच्या कार्यातून कर्मवीरांचे योगदान अधोरेखित*
*नाशिक* जनमत : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर डी. आर. भोसले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक देविदास भारती, प्रताप काळे व विजय पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शौर्य रायते व कृष्णा गुळवे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात पुरुषोत्तम थोरात यांनी सांगितले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाजोद्धाराच्या क्रांतिकारक विचारांचा प्रभाव समाजावर झाला. या विचारांतून प्रेरणा घेऊन अनेक तरुण समाजकार्याच्या क्षेत्रात पुढे आले. त्यामध्ये कर्मवीर डी. आर. भोसले यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
कर्मवीर भोसले यांनी शिक्षणाचा प्रसार, सहकार चळवळ, शेतकऱ्यांचे प्रबोधन तसेच गोरगरीब व गरजूंच्या मदतीसाठी आयुष्यभर भरीव कार्य केले. दूरदृष्टी व कल्पकतेच्या जोरावर बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.
भारतीय समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षण असून जात, पंथ, आर्थिक विषमता आणि सामाजिक परंपरांसारख्या अडथळ्यांवर मात करून शिक्षणाचा प्रकाश सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कर्मवीर डी. आर. भोसले यांनी केले. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण शिक्षण, सहकार आणि समाजसेवेसाठी समर्पित केला. शिक्षण, सहकार व समाजकार्यातील प्रत्येक उपक्रमामागे प्रेरणा देणारा तेजस्वी दीप म्हणजे कर्मवीर डी. आर. भोसले होत, असे थोरात यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता कांडेकर व आरुषी देवरे यांनी केले, तर श्रावणी भोसले व आदर्श काकुळते यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

: नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.


