नाशिकच्या २१ वर्षीय तेजसचे ‘महादान’; ब्रेनडेड तरुणाचे अवयवदान* *मुंबई, पुण्याला पाठवले हृदय अन् लिव्हर, नाशिकला त्वचा आणि नेत्र*

*नाशिकच्या २१ वर्षीय तेजसचे ‘महादान’; ब्रेनडेड तरुणाचे अवयवदान*
*मुंबई, पुण्याला पाठवले हृदय अन् लिव्हर, नाशिकला त्वचा आणि नेत्र*
*नाशिक :* समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तेजस गायकवाड या तरुणाचा उपचारादरम्यान मेंदू मृत (ब्रेनडेड) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही गायकवाड कुटुंबीयांनी दाखवलेल्या दातृत्वामुळे चार रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. तेजसच्या अवयवदानासाठी प्रशासनाने तातडीने रोड व एअर ग्रीन कॉरिडोर तयार करत हृदय विमानाने मुंबईत, तर लिव्हर आणि किडनी पुण्यात तर नाशिकमध्ये त्वचा व नेत्र अवघ्या काही तासांत यशस्वीरीत्या पोहोचवले.
आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालयात तेजसवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केल्यानंतर अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरची रीतसर परवानगी घेतली. डॉ. रकिबे यांच्या समुपदेशनानंतर गायकवाड कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत अवयवदानाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

*एअर अन् रोड ग्रीन कॉरिडॉर*
नाशिक विमानतळ ते मुंबई विमानतळ असा विशेष ‘एअर ग्रीन कॉरिडॉर’ तयार करून तेजसचे हृदय मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पोहोचवण्यात आले. एक किडनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, तर लिव्हर रुबी हॉल रुग्णालयाला पाठवण्यात आले. याशिवाय, दोन्ही नेत्र मविप्र रुग्णालयातील नेत्रपेढीस आणि त्वचा नाशिक येथील डॉ. नेहते रुग्णालयातील त्वचापेढीत दान करण्यात आली. तर एक किडनी नाशिकमध्येच मविप्र रुग्णालयात दान करून यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आली.
मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी आणि संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे आणि अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुंतागुंतीची प्रक्रिया पार पडली. या मोहिमेत नाशिक शहर पोलीस, आडगाव पोलीस ठाणे, एअरपोर्ट अधिकारी, जिल्हा रुग्णालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते आणि MPGMER चे न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय बुक्तार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*चौवीस तास निरंतर वैद्यकीय लढा*
सर्जरी विभागप्रमुख डॉ. कैलास मोगल, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कोडीलकर, भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. अलका कोशिरे यांच्यासह डॉ. विपुल गट्टानी, डॉ. रोहन रघुवंशी, डॉ. अभिजीत मोरे, डॉ. पार्थ देवगावकर, डॉ. पुष्पेन्द्र कुमार सहाणे, डॉ. नितीन ठाकरे, डॉ. निलेश पुरकर, डॉ. हेमंत पवार, डॉ. सरिता फुलकर, सहाय्यक नर्सिंग स्टाफ व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने २४ तास सलग परिश्रम घेऊन ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
*गायकवाड कुटुंबीयांचा निर्णय प्रेरणादायी!* “तेजसचा अपघातात दुर्दैवाने मेंदू मृत झाला. मात्र, एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय समाजोपयोगी, प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.”


